कल्याण, 28 जुलै : साचलेले पाणी, चिखल, रस्त्याची झालेली दुर्दशा , आजूबाजूच्या परिसरातील दुर्गंधी, गळके शेड… ही अवस्था आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची. जुन्नर, नाशिक नगर या महाराष्ट्रातील शहरांसह कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब या परराज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्या आणि फुलांचा पुरवठा या बाजार समितीमध्ये होतो. ठाणे जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या बाजार समितीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. किरकोळ विक्रेते याच बाजारातून खरेदी करून आपल्या परिसरात भाज्या आणि फुल विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र येथे येताना विक्रेत्यांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. सततच्या पडत असलेल्या पावसामुळे मुख्य भाजी व्यावसायिकांच्या भाज्या भिजून खराब होत आहेत. त्यामुळे नागरिकांपर्यंत भाजीचा पुरवठा करणे देखील त्यांना अवघड झालंय.
या कृषी समितीमध्ये 1700 ते 1800 नोंदणी कृत व्यापारी आहेत. आवारात एकूण 24 ते 25 इमारती आहेत. 180 ते 230 ट्रक बाहेरील राज्यातून येतात. तर 15 ते 20 गाड्या जवळच्या भागातून येतात अशी माहिती कृषी बाजार समितीतर्फे देण्यात आली. शासकीय संस्था असल्याने समितीला शासकीय अनुदान मिळत नाही समितीच्या उत्पन्नातून प्रशासकीय व्यवस्थापन खर्च भागवण्याबरोबरच विकास कामे केली जात आहेत. घनकचरा व्यवस्थापन सुविधा आहे पण खड्ड्यांचा मुद्दा पाहता रस्ते सिमेंट काँक्रीटचे होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सरकारी मदत मिळाल्यास व्यापारी आणि शेतकऱ्यांना सुविधा देणे सोपे होईल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पाऊस अन् पाण्याचा पडला वेढा, तान्हुल्या बाळासह 16 जण रात्रभर जीव मुठीत घेऊन बसले, अखेर..Video तर मार्केट बंद….. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारांकडून मार्केट शेअर्स आणि कल्याण डोंबिवली महापालिका गायधरकांकडून मालमत्ता कराचे रूपात कोट्यावधी रुपये वसूल करते. त्या बदल्यात मूलभूत सुविधा मिळत नाहीत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्यांवर गाळ व घाणीचे साम्राज्य आहे. याबाबत प्रशासनाला तक्रार करूनही सुधारणा होत नसल्याने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देणार आहोत. त्याची दखल घेऊन योग्य कारवाई झाली नाही तर तीन दिवस बाजार समितीमधील भाजी विक्री बंद ठेवण्यात येईल, असा इशारा फळ आणि भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष गणेश पोखरकर यांनी दिला.