डोंबिवली, 6 जुलै : मुंबईची लोकसंख्या वाढल्यानंतर मराठी माणूस मोठ्या प्रमाणात कल्याण-डोंबिवली परिसरात स्थिरावला. या दोन शहरांंमधून रोज लाखो नागरिक मुंबईत ये-जा करतात. मुंबईच्या जवळ असलेल्या डोंबिवली जवळच्या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. या भागातील महिलांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आलीय. डोंबिवली ग्रामीण भागातल्या जाधववाडी परिसरात गेल्या 6 वर्षांपासून पाणी टंचाई आहे. या भागात सुरूवातीला व्यवस्थित पाणी होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून आजूबाजूला अनेक इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे आमची पाईपलाईन कापण्यात आली. आता आमच्यावर कोरड्या नळाकडं पाहण्याची वेळ आलीय, असा आरोप येथील नागरिकांनी केला.
टाकी बसवली पण…. ‘पाणी नाही म्हणून अनेक वेळा प्रशासनाकडं अर्ज केला. त्यानंतर त्यांनी 6 महिन्यांपूर्वी तात्पुरती टाकी बसवली. पण, या टाकीवर झाकण नव्हते. त्यामध्ये पालापाचोळा पडत होता. आमच्या भागातील नागरिकांनी तात्पुरते झाकण ठेवले. पण, त्यावर किडे आणि वाळवी लागली आहे, असंही या नागरिकांनी सांगितलं. पाण्याचा एकही थेंब जाणार नाही वाया, सातवीतल्या मुलींचं भन्नाट संशोधन, Video टाकीत पाणी भरण्यासाठी दर दोन दिवसांनी टँकर आणला जातो. टँकर आणल्यानंतर पाणी भरण्याचे काम वस्तीतील नागरिकांनाच करावे लागते. त्यामुळे हे द्रविडीप्राणायम करताना येथे अपघात होण्याची भीती आहे. पाणी दूषित येत असून कधी कधी तर अक्षरशः पाण्यात आळ्या सापडतात अशी माहिती येथील नागरिक देतात. यामुळे वाडीतील नागरिकांना उलट्या, जुलाब, मुतखडा सारखे त्रास सुरू झाल्याची त्यांची तक्रार आहे. जाधववाडी परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांवर आम्ही पालिकेशी संपर्क साधला. त्यावेळी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी एमआयडीसीली प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती महापालिका अधिकारी शैलेश कुलकर्णी यांनी दिली.