अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 31 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप सिंधी समाजाकडून घेण्यात आला आहे. ठाण्यातील सिंधी समाजाने एकत्र येत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्याच्या कोपरी परिसरात मोठ्या संख्येने सिंधी समाज वास्तव्याला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिंधी समाजाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा सिंधी समाजाचा आरोप आहे. या विरोधात ठाण्यामध्ये वास्तव्याला असलेल्या सिंधी बांधवांनी कोपरीमधील शंकर मंदिरात एकत्र येत जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला. जोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणे, या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय सिंधी समाजाने घेतला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह कोपरीमधील सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







