ठाणे, 18 सप्टेंबर : ठाण्यात एका आत्महत्या करणाऱ्या महिलेचा ठाणे पोलिसनांनी जीव वाचवला आहे. ठाण्यात हा अगदी फिल्मी स्टाईल प्रकार घडला असून ठाणे पोलिसांच्या पोलीस नाईक गजेंद्र सोनटक्के यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट उपवन तलावात उडी मारुन महिलेचा जीव वाचवल्याची घटना घडली. ठाण्यातील उपवन परिसरात पोलीस नाईक गजेंद्र सोनटक्के आणि पोलीस नाईक संतोष मोरे हे दोघे आज साधारण रात्री 7 च्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना 2 मुली त्यांच्या जवळ धावत आल्या आणि त्यांनी गजेंद्र सोनटक्के यांना थांबवून एक महिला उपवन तलावात उडी मारत आहे, ती आत्महत्या करणार आहे, असं सांगितलं. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता गजेंद्र यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्याआधीच महिलेने उपवन तलावात उडी मारली होती. महिलेला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली होती. हे लांबून पाहत येत असलेले गजेंद्र यांनी धावत येत थेट तलावात उडी मारली आणि महिलेचा जीव वाचविण्याचे प्रयत्न सुरु केले. पण गजेंद्र सोनटक्के यांना ती महिला पकडून ठेवत असल्याने गजेंद्र यांचाही जीव धोक्यात आला होता. तरीही गजेंद्र यांनी जीवाची बाजी लावत महिलेला वाचवले आणि स्वत:ही सुखरुप बाहेर आले. हा सर्व प्रकार घटनास्थळी असलेल्या ठाणे करांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. गजेंद्र सोनटक्के हे महिलेचा प्राण वाचवून बाहेर येताच उपस्थितीत ठाणेकरांनी गजेंद्र सोनटक्के यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. आधीच कोविड काळात हे खाकी वर्दीवाले करोना योद्धे आपले रक्षण करत आहेत. त्यात आता गजेंद्र सोनटक्के यांनी पुन्हा एकदा खाकीतल्या देवाचे दर्शन दिल्याने खाकी वर्दीवरील विश्वास आणखी घट्ट झाल्याचं पाहायला मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.