ठाणे, 1 फेब्रुवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम ग्राऊंड असलेल्या ठाण्यामध्ये जोरदार राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना खिंडीत गाठण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सर्वच पक्षांमधून इनकमिंग सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठी संख्या असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे 22 माजी नगरसेवक पक्ष सोडणार असून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज्यातल्या सत्तांतरानंतर भाजप सोडून इतर पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टार्गेटवर आले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना वाढवून आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे, त्यासाठी दररोज पक्षांतर सुरू आहेत. ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे 60 पेक्षा जास्त माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. आता नंबर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. येत्या काही महिन्यांमध्ये ठाणे महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. महापालिकेत आपली सत्ता कायम राहण्याकरता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने साम-दाम-दंड-भेद ही नीती राबवायला सुरूवात केली आहे. ठाण्यामध्ये याच महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे शहरामध्ये बॅनरवॉर सुरू झालं आहे. कुठे खोके तर कुठे बोके, असे बॅनर लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पक्षात घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेने जितेंद्र आव्हाड यांना धोबीपछाड दिला आहे, पण त्यांचं मुख्य टार्गेट जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ असल्याचं स्पष्ट होतंय. जे नगरसेवक पक्षात येत आहेत, त्यातला एका नगरसेवकाला आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात उभं करण्याची रणनीती बाळासाहेबांच्या शिवसेनेने आखली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.