मुंबई, 29 मार्च: गेल्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला होता. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाढलेलं तापमान काही अंशी कमी झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातला पारा वाढला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी (temperature in maharashtra) पार गेला आहे. उन्हामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे. पारा वर गेल्याने नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे उष्णाघाताचा धोका टाळण्यासाठी दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात येत आहे.
दरवर्षी कोकण पट्ट्यात नागरिकांना उन्हाचा फारसा त्रास जाणवत नाही. पण यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाचं सुर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकणातील नागरीकही हैराण झाले आहेत. पुढील दोन दिवस विदर्भ (Vidharbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. कारण 30 आणि 31 मार्च रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मार्च 30,31 दरम्यान विदर्भात व संलग्न मराठवाडा भागात तापमान वाढीची शक्यता, तापमान 42° च्या वर जाण्याची शक्यता. IMD GFS Model guidance given below, Will update.. pic.twitter.com/c8a84OzzUs
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 28, 2021
27 रोजी राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला होता. त्यानंतर दोन दिवस काही अंशी कमी चटके दिल्यानंतर उद्या (30 मार्च) आणि परवा (31 मार्च) रोजी पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. चेहरा झाकण्यासाठी रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, त्याचबरोबर दिवसभरात भरपूर पाणी प्यावं, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
(वाचा - नागपूरकरांच्या चिंतेत वाढ; सलग सहाव्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा 3000 पार)
पुढील काही दिवस तापमानाचा हा वाढता पारा कायम राहणार आहे. गरम आणि कोरड्या उत्तर पश्निमी वाऱ्यावमुळे मुंबईतील तापमान वाढत आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Weather forcast