मुंबई, 21 जानेवारी : सध्या सर्व पक्षांना दिल्ली निवडणुकीचे वेध लागले आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून विविध प्रकारच्या प्रोपोगंड्याचीही सुरुवात झाली आहे. 'पॉलिटिकल किडा' या ट्विटर हॅंडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तानाजी चित्रपटाचा प्रोमो आहे. या प्रोमोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जागी अमित शहा असलेला चेहरा दाखविण्यात आला आहे. दिल्ली निवडणुकांचा गड़ सर करण्यासाठी तानाजी म्हणजेच गृहमंत्री अमित शहा एकमेव पर्याय असल्याचे या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरुपाचं मतदारांचे मतपरिवर्तन करण्यास उद्युक्त करणारे व्हिडिओ येत असतात. मात्र या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखविल्यामुळे शिवभक्त नाराज झाले आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या व्हिडिओबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यंना पाठवल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली बंद करणारे या व्हिड़िओवर काय प्रतिक्रिया देतात ते पाहायला हवे, असे राऊत यावेळी म्हणाले.
या मॉर्फिंगमुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्तं केला जातोय. दिल्ली निवडणुक प्रचारात भाजपच्या सोशलमीडिया टीमकडून असे माँर्फिंग केलेले प्रोमो व्हायरल केल्यामुळे पुन्हा मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे. तानाजी सिनेमाचा प्रोमो एडिट करून त्याचं शहाजी असं नाव करण्यात आलंय. तर उदयभान राठोड यांच्या भूमिकेत अरविंद केजरीवाल यांना दाखवण्यात आलंय. तानाजींच्या भूमिकेत अमित शहा दाखवण्यात आलेत. याच प्रोमोत नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा मोठा वाद होऊन गदारोळ होणार हे नक्की. ही चित्रफित तत्काळ मागे घ्यावी अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील, असे यावरील शेकडो प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे.