इंदुरीकर महाराजांवर सुप्रिया सुळे यांची टीका, म्हणाल्या...

इंदुरीकर महाराजांवर सुप्रिया सुळे यांची टीका, म्हणाल्या...

ह. भ.प. निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यावर विविध स्तरातून टीका होत आहे

  • Share this:

हरीश दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 15 फेब्रुवारी :ह. भ.प. निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यावर विविध स्तरातून टीका होत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील इंदुरीकर यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.

आज अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडलंय. तसंच पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपरे, पोपटराव पवार आणि जहीर खान यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकर महाराज यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली.

'पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा पसरवली जाणं दुर्दैवी असून किर्तनकारांबद्दल माझ्या मनात मान सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही. यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलोय. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी आहे, असं परखड भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. 'आमच्या विरोधकांनी आमच्यावर दिलदारपणे टीका करावी. विश्वासाने लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. पाच वर्षे सरकार टिकवणे आमची जबाबदारी आहे. निवडणूक जर झाली तर जनतेचा पैसा खर्च होणार, केंद्र सरकार आज राज्याला निधी देत नाही. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आज राज्य संकटात सापडले आहे', असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिलं.

तसंच, मंत्रालय आपल्या हक्काचं आहे असं आज लोकांना वाटू लागलंय. हे मायबाप सरकार नाही तर राज्यातील जनता मायबाप आहे, असंही सुळे यांनी सांगितलं.

'महाराष्ट्रात वाढते महिला अत्याचार हा सामाजिक प्रश्न असून केवळ कायदे कडक करून हा प्रश्न सुटणार नाही तर समाजात प्रबोधन करण्याची गरज असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. घरगुती अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत याचा विचार करण्याची गरज' असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

इंदुरीकर संतापले, कीर्तनाला रामराम करून धरणार शेतीची वाट?

दरम्यान,  कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार  इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडून शेती करेन, असं वक्तव्य केलं आहे. 'दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जावू शकतं. मी जे बोललो ते अनेक ग्रंथात नमूद आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला' असं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

इंदुरीकर महाराजांना या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचा धनी व्हावं तर लागलंच पण त्याच बरोबर त्यांच्या अडचणीतही वाढ झाली. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून नोटीस काढण्यात आली आहे. पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या  पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे.

First published: February 15, 2020, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading