गोंदिया, 8 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होत्या. मात्र, आता अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. साताऱ्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. अजित पवाराच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्या असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केला. ते गोंदियात बोलत होते. काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे असताना ते कितीदा मंत्रालयात बसायचे त्याची श्वेतपत्रिका काढून लोकांना वाटाव्या, त्यांच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्या. हजारो दारूच्या बाटल्या सापडण हे मंत्रालयाचे काम आहे का? असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी करत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. आताचे मंत्री हे मंत्रालयात बसत नसून फिरत असतात, या अजित पवारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार बोलत होते. वाचा - ‘अशा प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला ठेवा..’ शरद पवारांचे कर्नाटकात आवाहन, शेतकऱ्यांना दिलं आश्वासन अजित पवार काय म्हणाले होते? विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आत्ताच्या सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरले आहेत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये रेट ठरलेले आहेत. सत्तेत आम्ही होतो पण सत्तेचा माज आम्ही केला नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला. आत्ताचे मंत्री कुणाला विचारत नाहीत, मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं कामं करुन देण्यासाठी मार्केटमध्ये फिरतायेत, असा गंभीर आरोप सुद्धा अजित पवार यांनी केला आहे. पवारांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले शरद पवार यांनी मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर शरद पवार यांनी शुक्रवारी (5 मे) पुन्हा निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उधाण आले. याबद्दल अजित पवार यांना विचारताच ते भडकल्याचे पाहायला मिळाले. ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.