बुलढाणा, 17 ऑगस्ट : राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झालं. यासाठी नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं होतं. यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्तानं देशात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आली आहे. यादरम्यान बुलढाणा जिल्ह्यात एक विशेष घटना पाहायला मिळाली. अंतयात्रेचा कार्यक्रम थांबून काजेगाव ग्रामपंचायतसमोर समूह राष्ट्रगीत गायले गेले. अंतयात्रा थांबून राष्ट्रगीत गायन आज म्हणजेच बुधवारी सकाळी 11 वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झालं. राष्ट्रगीताच्या या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा असेही एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटलं होतं. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले होते. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील काजेगाव येथे 16 ऑगस्ट रोजी गावातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या सुमनबाई काशीराम बोरणारे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. आज 17 तारखेला त्यांच्या निवासस्थानावरून अंतयात्रा ग्रामपंचायतच्या दरम्यान अकरा वाजता पोहोचली. तेव्हा राष्ट्रगीत गायनाची वेळ झाली. यावेळेस अंत्ययात्रेला उपस्थित असलेले पाहुण्यांनी सर्वानुमते निर्णय घेऊन अंत्ययात्रा ग्रामपंचायतसमोर ठेवून थांबून राष्ट्रगीत घेण्यात आले.
‘अहो बांगर, सबुरीने घ्या’, एकनाथ शिंदेंचा मोलाचा सल्ला, इतर आमदारांनाही सूचना
दिवंगत सुमनबाई बोरणारे यांना राष्ट्रगीताविषयी नेहमीच आदर होता. त्या मागील कित्येक वर्षापासून 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला न चुकता ध्वजारोहणाकरिता शाळेत किंवा ग्रामपंचायतला हजर असत. स्वयंपूर्ण राष्ट्रीय सण साजरा करत तसेच लहान बालगोपाळांना साहित्य व खाऊ देऊन इतिहासाबद्दल माहिती सुद्धा द्यायच्या. त्यांना लेखनाची, वाचनाची तसेच कविता व गीत लिखाणाची, गायनाची आवड होती. आज काजेगाव वासियांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून दिलेली श्रद्धांजली हे खरंच आगळीवेगळी श्रद्धांजली आहे.