धुळे, 05 मार्च : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसच्या भाड्यासाठी पैसे कमी पडल्यामुळे महिलेला लहान मूल व पतीसह रात्रीच्या वेळी वाहकाने बसमधून रस्त्यातच खाली उतरवून दिल्याचा प्रकार अमळनेर शहराबाहेर घडला. याबाबत धुळे आगाराच्या वाहकाविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.
एकीकडे उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करीत असताना दुसरीकडे अशा घटना समोर येत आहेत. साबीर शब्बीर शेख हे पत्नी आणि लहान मुलासह रात्री 9 वाजता धुळ्याला जाण्यासाठी बसमध्ये बसले. त्यांच्याकडे भाड्यासाठी 20 रुपये कमी होते. त्यावेळी त्यांनी वाहकाला विनवणी केली की, तुम्हाला ऑनलाइन पैसे टाकून देतो किंवा धुळ्याला जाऊन पैसे देतो.
मात्र, वाहकाने याबाबत काहीच ऐकून घेतले नाही. या वादात बस शहराबाहेर निघून आली होती. वाहकाने शब्बीर शेख, त्यांची पत्नी व मुलाला रात्री रस्त्यावर उतरवून दिले.
धुळ्यात धक्कादायक घटना
पोटच्या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खुनात मयत तरुणाच्या पत्नीसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेषतः कोणताही पुरावा नसताना मयताच्या खिशातील बसच्या एका तिकिटावरून धुळ्याच्या पोलीस पथकाचा तपास मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला. यातून मयताच्या पत्नीसह चौघांना वेड्या ठोकण्यात आले आहेत.
शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे हात ओढणीच्या साहाय्याने बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली.
घटनास्थळावर मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नव्हता. मात्र मयत तरुणाच्या खिशामध्ये असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका तिकिटाच्या मदतीने पोलीस तपास थेट मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील पोरबंदर गावापर्यंत जाऊन पोहोचला.
मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या पथकाने केला.