प्रीतम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर, 20 मे : एसटी बसला सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात (ST bus accident in Solapur) झाला आहे. एसटी बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही बस अक्कलकोट (Akkalkot)हून कल्लाप्पावाडीकडे जात होती आणि त्याच दरम्यान एसटीला अपघात झाला. एसटी बस रस्त्यावरुन थेट शेजारील शेतात जाऊन पलटली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बस पलटली आहे. या बसमध्ये एकूण 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. खराब रस्त्यामुळे एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं बोललं जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. तर अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपुरात भीषण अपघात, 9 जणांचा होरपळून मृत्यू
चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला होता. पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. या अपघातात 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे.
मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात कोळसा झालाय.
ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Solapur, St bus, St bus accident