मुंबई, 28 ऑक्टोबर : संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरही अडचणीत सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी एसआरए घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली आहे. उद्या पुन्हा पेडणेकर यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी बोलावलं आहे. दादर पोलीस स्टेशनमध्ये किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली गेली. एसआरए घोटाळा प्रकरणी जून महिन्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती, पण एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव नव्हतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती, यामध्ये किशोरी पेडणेकर यांचा शेजारी आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश आहे. तर एक मुंबई महापालिकेचा कर्मचारी आहे. यातल्या दोघांनी स्टेटमेंटमध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलं. एसआरएचा फ्लॅट द्यायच्या नावाखाली पैसे घेतले गेले, पण फ्लॅट मिळाला नाही, अशी तक्रार 9 जणांनी दाखल केली होती. या 9 जणांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही भाग किशोरी पेडणेकर यांना देण्यात आल्याचं अटकेत असलेल्या आरोपींनी सांगितलं, त्यामुळे आज पहिल्यांदाच किशोरी पेडणेकर यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. किरीट सोमय्यांचे आरोप दरम्यान किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर आणखी आरोप केले आहेत. पेडणेकरांनी जे गरिबांचे गाळे ढापले, ते त्यांनी भाऊबीजेनिमित्त परत करावेत. मुख्यमंत्र्यांशी मी बोललो आहे. एसआरएला पत्र पाठवलं आहे. वरळी गोमाता जनतामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराने अर्धा डझन गाळे झोपडपट्टी वासियांच्या नावाने ढापले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दिवाळीनंतरची भाऊबीज, किशोरी ‘ताई’कडे किरीट ‘भाऊ’नी मागितलं हे रिटर्न गिफ्ट!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.