मुंबई, 28 ऑक्टोबर : राज्यात धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. भाऊ-बहिणीचं नातं असलेली भाऊबीज साजरी झाली, पण राजकीय भाऊबीज काही संपायचं नाव घेत नाहीये. किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकर यांच्यात राजकीय भाऊबीज पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या माझे भाऊ आहेत, मती जागेवर ठेवून मातीसाठी काहीतरी करा, असा सल्ला किशोरी पेडणेकर यांनी दिला. याला आता किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी भाऊबीजेचं रिटर्न गिफ्ट काय द्यावं, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. काय म्हणाल्या पेडणेकर? ‘किरीट आजही भाऊ आहेत. त्यांचं काम हे त्यांच्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे चोख बजावतात, त्यांचं ठीक आहे तो भाऊ आहे. हे बाकीचे जे आहेत पक्षबंधू, गुरूबंधू, मूंहबोला भाऊ, तसे हे भाऊ आहेत. सगळ्यांना अभिष्टचिंतन करतेच, पण त्याबरोबरच मती जागेवर ठेवून मातीसाठी काहीतरी करा, खाऊ नका,’ असं किशोरी पेडणेकर किरीट सोमय्या यांना म्हणाल्या.
किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर दरम्यान किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. पेडणेकरांनी जे गरिबांचे गाळे ढापले, ते त्यांनी भाऊबीजेनिमित्त परत करावेत. मुख्यमंत्र्यांशी मी बोललो आहे. एसआरएला पत्र पाठवलं आहे. वरळी गोमाता जनतामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराने अर्धा डझन गाळे झोपडपट्टी वासियांच्या नावाने ढापले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.