राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 1 जुलै : बुलढाण्याच्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात 25 जणांच्या मृत्यूने महाराष्ट्राला जबर हादरा बसला आहे. या अपघातात वर्धा शहराच्या कृष्ण नगर येथील तेजस पोकळे या युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबाला जबर हादरा बसला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर आता त्याच्या आईचा आक्रोश करणारा व्हिडिओ समोर आला आहे. पोटचा मुलगा अपघातात मृत्यूमुखी पडल्याने तेजसच्या आईने शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला आहे. बुलढाणाच्या शासकीय रुग्णालय परिसरही हे दृश्य पाहून सुन्न झाला आहे.
तेजसच्या आईचा आक्रोश, हातात आलेला मुलगा गमावला. बुलढाणा अपघातात वर्ध्याच्या तेजसचा दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारपासून पुण्यातील एका कंपनीत तो रुजू होणार होता. #BudhanaAccident #News18Lokmat #samruddhihighway pic.twitter.com/Q1TibNDCKC
— News18Lokmat (@News18lokmat) July 1, 2023
तेजस रामदास पोकळे हा अत्यंत हुशार आणि होतकरू मुलगा होता. वडील रोजमजुरी करीत असल्याने त्याच्यावरचं कुटुंबाचा संपूर्ण भार होता. त्याने औरंगाबाद येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते. पहिल्याच झटक्यात मुलाखतीत निवड झाली होती. पुण्यात चांगली नोकरीही मिळाली होती. सोमवारपासून त्याला कामावर रुजू व्हायचं होतं. म्हणून शनिवारी बसने तो पुण्याच्या दिशेने निघाला होता. मात्र, त्याच्या आयुष्याचा प्रवास येथेच थांबला.
त्याच्या वडिलांचे साधे फर्निचरचे दुकान आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण आहे. आई वडिलांचा आधार होऊन नोकरीतून त्यांची सेवा करून सुख देण्याचे स्वप्न उराशी बाळगून निघालेला तेजसचा हा अखेरचा प्रवास ठरला. तो राहत असलेल्या परिसरात सर्वांकडूनच त्याच्या गुणवत्तेची प्रशंसा होत असून त्याच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.