सोलापूर, 2 फेब्रुवारी : राज्यात सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात बारावीच्या परीक्षेच्या निमित्ताने तरुणीच्या जिद्दीचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. सलाईन लावलेल्या अवस्थेत या तरुणीने बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर दिला. नेमकं काय घडलं - प्रेरणा विनोद बाबर हिला मंगळवारी करमाळा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तिचा रसायन शास्त्राचा पेपर होता. यावेळी तिच्या जिद्दीचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. करमाळा तालुक्यातील रायगाव येथील बारावीची परीक्षार्थी पेपर चुकू नये म्हणून हॉस्पिटलमधून सलाइनसह रुग्णवाहिकेतून थेट ही विद्यार्थिनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय केंद्रावर दाखल झाली. यावेळी महाविद्यालयाचे केंद्र संचालक संभाजी किर्दाक यांनी तिला सलाइनसह पेपर सोडवता येईल, अशी अनुकूल व्यवस्था करण्याची तत्परता दाखवली. प्रेरणा ही करमाळ्यातील महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. पेपर सोडवताना देखील परिचारीका राजश्री पाटील यानी डॉ. रविकिरण पवार व डॉ. कविता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू ठेवले होते. प्रेरणाने सलाईनसह रसायनशास्त्राचा पेपर व्यवस्थित लिहिला. राज्यात पहिला, मात्र DSP च्या स्वप्नासाठी पुन्हा दिली परीक्षा; अखेर सांगलीच्या प्रमोदने मिळवलंच! प्रेरणा बाबरने सलाईन लावलेल्या अवस्थेतही रसायनशास्त्राचा पेपर दिल्यानंतर पेपर कक्षातून बाहेर येताना प्रेरणाच्या चेहऱ्यावर आजारी असतानासुद्धा परीक्षा दिल्याचे समाधान दिसत होते. बारावीचे हे माझे अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष होते. त्यामुळे महत्वाचा रसायनशास्त्राचा पेपर चुकवायचा नव्हता. केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक, सहकेंद्र संचालक प्रा. लक्ष्मण राख, प्रा. सुवर्णा कांबळे व इतर पर्यक्षेकांनी सहकार्य केल्यामुळे मी परीक्षा देऊ शकले, असे प्रेरणा बाबर ही विद्यार्थिनी म्हणाली. सलाईन लावलेल्या अवस्थेतही तिने आपला बारावीचा पेपर दिला. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.