विरेंद्रसिंह उटपट, प्रतिनिधी सोलापूर, 8 जून : करमाळा शहराजवळ अहमदनगर रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट मोटारीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळला होता. पोलीस तपासात हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 16 तासांत गुन्ह्याचे धागेदोरे शोधून दोन भावांना अटक केली. आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्यामुळे चिडून दोघा भावांनी अन्य एका महिलेसह कट रचून हा खून केल्याचे समोर आले आहे. श्रावण रघुनाथ चव्हाण (वय 39, रा. अडसुरे, ता. येवला, जि. नाशिक) असे खून झालेल्या पुरूषाचे नाव आहे. त्यांचा भाऊ संभाजी चव्हाण यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यात सुनील शांताराम घाडगे (वय 28) आणि राहुल शांताराम घाडगे (वय 30, रा. अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक) या भावांसह अन्य एका महिलेचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. घाडगे भावांना अटक करण्यात आली असून महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे. वाचा - महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून.. आईसोबत अनैतिक संबंध असल्याने खून आपल्या आईबरोबर मृत श्रावण चव्हाण याचे असलेले अनैतिक संबंध उजेडात आल्यामुळे दोघे घाडगे भाऊ चिडले होते. त्यांनी एका महिलेला सोबत घेऊन श्रावण चव्हाण याच्या खुनाचा डाव रचला. त्याप्रमाणे त्यांनी श्रावण चव्हाण यास गावात बोलावून घेतले. नंतर एका महिलेसह घाडगे भावांनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला. नंतर त्याच्याच स्विफ्ट मोटारीत मृतदेह घालून दूर अंतरावर करमाळा भागात आणून माळरानावर टाकून दिला. मोटारीसह मृतदेह अर्धवट जळाला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी कौशल्याने तपास करून गुन्हा उजेडात आणला. या गुन्ह्यातील तिस-या महिला आरोपीला अटक करायची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.