विशाल देवकर, प्रतिनिधी :
नागपूर, 14 मार्च : वाटेत लाख संकटं उभी राहिली तरी त्या संकटावर मात करत मार्गक्रमण करणाऱ्यांच्या गळ्यात विजयश्री माळ घालत असते. राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या केदार बारबोले यांचा आजवरचा प्रवास देखील असाच आव्हानात्मक होता. केदार यांनी मोठ्या हिंमतीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या परीक्षेत सहावा क्रमांक पटकावला आहे. त्यांची पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झालीय. त्यांचा आजवरचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
कसा झाला प्रवास?
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील मारफळ हे केदार बारबोले यांचं गाव आहे. एका पत्र्याच्या घरात लहानाचा मोठा झालेल्या केदारला या प्रवासात अनेक अडचणी आल्या. वडिलांच्या अकाली निधनानंतर दु:खाचा मोठा डोंगर त्यांच्या अंगावर कोसळला. त्यानंतरही त्यांनी अभ्यासावरील फोकस हटू दिला नाही. राज्यसेवा परीक्षेत सलग दुसऱ्यांदा त्यांनी यश मिळवलंय.
नाशिकच्या मुलीनं करुन दाखवलं! अपयशानंतरही न खचता झाली उपजिल्हाधिकारी, Video
आईला सर्व श्रेय
'माझे वडील माढ्यातील मनकर्णा पतसंस्थेत काम करत होते. माझे शालेय शिक्षण सुरू असतानाच 2008 साली त्यांचे अचानक निधन झाले. त्यावेळी माझ्या आइने कुटुंबाची जबाबदारी सांभाळून,शेतात राबून माझे व माझी तीन बहिणींचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर आईनंचं माझ्या 3 बहिणींची लग्न लावली.
आपण अभ्यासात हुशार आहोत हे ओळखून मी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एका खासगी कंपनीतील नोकरी सोडली. माझ्या या धाडसी निर्णयाला आईनं संपूर्ण पाठिंबा दिला. माझ्या आजच्या यशाचं सर्व श्रेय तिचं आहे,' अशी भावना केदारनं व्यक्त केली.
शेतकऱ्याची लेक आली राज्यात दुसरी! यशाची प्रेरणा सांगताना म्हणाली...Video
केदार यांनी यापूर्वी 2020 साली मी पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक निबंधक म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले होते. त्यानंतर 2021 साली झालेल्या एमपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळाले असून यंदा राज्यातून सहावा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुलाखतीमध्ये सर्वाधिक 75 टक्के मार्क्स मिळवले आहेत. त्यांच्या या यशानंतर गावकऱ्यांनी केदार आणि त्यांच्या आई कुसूम बारबोले यांची मिरवणूक काढून त्यांचं अभिनंदन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Local18, MPSC Examination, Nagpur, Solapur, Success story