अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 28 मार्च : वडील मिलमध्ये कामाला पण मिल बंद पडली आणि नोकरी गेली. मग पानटपरी चालवून घर सांभाळलं. आर्थिक अडचणी असल्यानं शिक्षणातही अनेक अडथळे आले. पण जिद्दीनं सोलापुरातील पानटपरी चालकाचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. अॅड. गणेश पवार यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेत यश मिळवलं आहे.
घरची परिस्थिती हालाखिची
अॅड. गणेश पवार यांचे वडील तानाजी पवार हे मिल कामगार होते. सोलापुरातील मिल बंद पडल्या आणि हजारो कामगार बेरोजगार झाले. तानाजी पवार यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे जावून शेतीचा पर्याय निवडला. परंतु, निसर्गाने साथ दिली नाही. अखेर परत सोलापुरात येऊन छत्रपती शिवाजी चौक येथे पानटपरी सुरू केली. त्यातून घराचा आर्थिक डोलारा सांभळत होते. तर मुलगा गणेश पवारही पानटपरी चालवून मदत करत असत.
गणेश पवार यांच्या शिक्षणात अडचणी
घरची परिस्थिती हालाखिची असल्याने गणेश पवार यांच्या शिक्षणात अनेक अडचणी आल्या. वडिलांना पानटपरी चालवून मुलांच्या शिक्षणाचा भार पेलणे शक्य नव्हते. काही काळ मुलगा गणेश आणि मुलगी सोनाली यांना मोहोळला मामाकडे ठेवले. गणेश यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण सोलापुरातील महापालिकेच्या शाळेत, पाचवीचे शिक्षण मोहोळमध्ये नेताजी प्रशालेत, सहावी-सातवी सह्याद्री शाळेत तर आठवी ते बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण जैन गुरुकुलमध्ये झाले.
वडिलांच्या सल्ल्याने वकिलीच्या क्षेत्रात
गणेश यांना 12 वी नंतर इंजिनिअरिंग करायचे होते. मात्र, आर्थिक अडचणीमुळे इंजिनिअरिंग करता आले नाही. त्यामुळे विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. गणेश यांनी वकिलीचे शिक्षण घ्यावी अशी वडिलांची इच्छो होती. त्यासाठी दयानंत कॉलेजमध्ये 'लॉ'साठी प्रवेश घेतला. 2009 मध्ये एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि वकिलीची प्रॅक्टीस सुरू केली. वकिलीचे शिक्षण घेत असताना गणेश यांनी पानटपरी चालवून अभ्यास केला. मात्र, शिक्षणात खंड पडू दिला नाही.
न्यायाधीश म्हणून निवड
नुकताच न्यायाधीश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अॅड. गणेश तानाजी पवार हे जिल्हा न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण झाले. यापूर्वीही 2017 मध्ये त्यांची प्रथम श्रेणीतील दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली होती. परंतु काही कारणास्तव त्यांनी ती पोस्टिंग स्वीकारली नाही. आलेल्या परिस्थितीची कारणे न सांगता त्याचा सामना करत मोठ्या जिद्दीने गणेश आज न्यायाधीश झाले आहेत.
बहीण सोनालीही आहेत न्यायाधीश
अॅड. गणेश यांनी न्यायाधीश परीक्षेत यश मिळवले आहे. तर त्यांच्या भगिनी सोनाली या देखील न्यायाधीश बनल्या आहेत. आई-वडिलांच्या पाठबळामुळेच हे शक्य झाल्याचे अॅड. गणेश पवार सांगतात. सोलापुरातील विविध संघटनांच्या माध्यमातून अॅड. गणेश हे कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर बार असोसिएशनचे सचिव आहेत. तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या स्थापनेपासून सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.
Solapur : शिपायाच्या मुलीनं घडवला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश! Video
मोफत शिकवणीतून 25 विद्यार्थी न्यायाधीश
अॅड. गणेश पवार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानतात. सोलापुरात अॅड. दंडवते यांनी न्यायाधीश पदासाठी मोफत शिकवणी सुरू केली होती. गुरूची ही परंपरा गणेश यांनी पुढे सुरू ठेवली. आज महाराष्ट्रात त्यांचे जवळपास 25 विद्यार्थी कनिष्ठ दिवाणी न्यायालयात न्यायाधीश आहेत. तर दहा ते बारा विद्यार्थी जिल्हा न्यायाधीश आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Justice, Local18, Solapur, Solapur news, Success story