सोलापूर, 03 डिसेंबर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील 40 गावांसह सोलापूर, अक्कलकोट हा भाग आमचाच असल्याचे तथ्यहीन वक्तव्य केले होते. यावरून आता जोरदार राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह अक्कलकोटमधील काही गावकऱ्यांची खरच कर्नाटकात विलीन होण्याची मागणी असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील गावांकडे लक्ष न दिल्याने त्या गावांची मानसिकता झाल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याच्या उडगी गावातील ग्रामस्थ महाराष्ट्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मागच्या 75 वर्षांत पुरेश्या सुविधा न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त होत कर्नाटकचे झेंडे आणि गळ्यात उपरणे घालून कर्नाटकमध्ये विलीन होण्याच इच्छा व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारला कोर्टाचा दणका; राज्य सरकारच्या त्या महत्त्वाच्या निर्णयाला स्थगिती
महाराष्ट्र सरकारकडून मागच्या 75 वर्षांत कोणत्याच सुविधा वेळे पोहोचल्या नाहीत. ग्रामस्थांच्या मागण्या ह्या रस्ता, लाईट, पाणी या प्रमुख मागण्या आहेत परंतु सरकार आमच्याकडे लक्ष देत नसल्याने आम्ही हा निर्णय घेत असल्याचे ग्रामस्थ म्हणाले.
मुख्यमंत्री जत तालुक्याच्या मागण्यांबाबत सकारात्मक
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद मागच्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. परंतु सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याला पाणी नसल्याने कर्नाटक सरकारने तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांना पाणी देऊन महाराष्ट्र सरकारला एकप्रकारे आव्हान दिले आहे. या सगळ्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊले उचलत जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
हे ही वाचा : साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांनी दिली चुकीची माहिती अधिकाऱ्यांकडून खुलासा
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना जत तालुक्यातील काही लोक भेटण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी तालुक्यातील लोकांच्या समस्य ऐकून घेत पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये आम्ही 2 हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, रात्री दीड वाजता जतमधील लोक आले होते. त्यांनी जत तालुक्याचा नकाशा आणला होता यावेळी नकाशावर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. आम्ही तुमच्यासाठी 2 हजार कोटींचं टेंडर काढत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.