सोलापूर, 16 जानेवारी : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेत भाकणुकीला मोठं महत्त्व आहे. भाकणुकीमध्ये वर्षभरातील भविष्याचा संकेत वासरू देते. रविवारी मकर संक्रातीच्या दिवशी ही भाकणूक प्रथा पार पडली. या भाकणुकीच्या माध्यमातून वर्षभरातील भविष्य काय असेल, याचा अंदाज सांगण्यात येतो. यंदा मोठी नैसर्गिक आपत्ती येईल, असा भीतीदायक अंदाज भाकणुकीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. काय आहे अंदाज? सिद्धरामेश्वर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होम हवन केले जाते. त्यानंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या वासराला भाकणुकीच्या स्थळी आणले जाते. यात्रेतील मानकरी देशमुख यांनी या वासराची पूजा केली. त्यानंतर त्यांनी ते वासरू प्रमुख मानकरी हिरेहब्बुंच्या स्वाधीन केले. या वासरासमोर सर्व प्रकारचे धान्य ठेवण्यात आले होते. दिवसभर उपाशी असलेलं हे वासरू अचानक बिथरलं आणि सर्वांच्या अंगावर धावून गेले. त्यांना नियंत्रण आणणे अनेकांना अवघड जात होते. अखेर, गोंजारून वासराला शांत करण्यात आले. दिवसभर उपाशी असलेल्या वासरानं समोर ठेवलेल्या कोणत्याही पदार्थात तोंड घातले नाही.
किल्लारीसारखी आपत्ती? वासरू आल्यानंतर अचानक बिथरल्यानं यावर्षी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते असा अंदाज हिरेहब्बू यांनी व्यक्त केला. ’ मागच्या 25 वर्षात मी वासराला पहिल्यांदाच इतकं आक्रमक पाहिलं आहे. यापूर्वी महाराष्ट्रात किल्लारीमध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी वासरानं अशाच प्रकारे वेगळा आवाज काढला होता. त्यानंतर ते सर्वांवर धावून गेले होते. अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यापूर्वी 1985 साली वासरू अंगावर धावून आले होते. तेव्हाचे वर्ष देखील व्यवस्थित गेले नव्हते. यावर्षी जे वाईट घडेल ते सोलापूरच्या बाहेर घडेल. सोलापूरमध्ये काहीही होणार नाही. हा मला विश्वास आहे.’ असा अंदाज हिरेहब्बू यांनी सांगितला. सोलापूरचा स्पेशल 12 भाज्यांचा गरगट्टा कसा बनतो? पाहा Video यावर्षी उत्तम पाऊस ‘वासराने भाकणुकीच्या दरम्यान दोनदा मलमुत्र विसर्जन केले. त्यामुळे यंदा मोठा पाऊस असेल. त्याचबरोबर एकही खाद्यपदार्थ खाल्ला नाही. याचा अर्थ अन्नधान्याच्या किंमती व्यवस्थित आहेत, असा होतो’ अशी माहितीही हिरेहब्बू यांनी दिली. सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना मी सिद्धेश्वरच्या चरणी करतो असं ते यावेळी म्हणाले.