सोलापूर, 10 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभेची जागा कोणी लढवायची, याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे विधान केले होते. त्यांनी सोलापूर लोकसभा जागेवर अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा दावा सांगितल्यामुळे सोलापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले. यानंतर सोलापूर लोकसभेच्या जागेसंदर्भात विधान करणारे आमदार रोहित पवार कोण? असा प्रतिसवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सोलापुरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू केली. यावर अखेर रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार यांनी ट्विट केलंय, की आमदार ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया. राहीला प्रश्न सोलापूरच्या जागेचा तर त्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, मी कुठलाही दावा केला नव्हता, मी केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती.", असं म्हणत राहित पवार यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा - राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात! अश्लील व्हिडीओ बनवून मागितली खंडणी काय आहे प्रकरण? सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची राखीव जागा काँग्रेसने स्वतः न लढविता राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी या पक्षाच्या स्थानिक पातळीवर होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अशाच आशयाचे विधान काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही सोलापूर भेटीत, सोलापूर लोकसभेची जागा कोणी लढवायची, याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे विधान केले होते.
सोलापुरात दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर रोहित पवार हे पहिल्यांदाच आमदार झाल्यामुळे कदाचित अजून त्यांच्यात पोरकटपणा असेल, असा खोचक टोला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी रोहीत पवारांना लगावला आहे. आणखी काही काळ गेल्यानंतर त्यांच्यात पोक्तपणा येऊ शकेल, अशा परखड शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसला झोंबणारे असल्यामुळे सोलापुरात दोन्ही काँग्रेसमधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.