अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 4 फेब्रुवारी : आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असलेला व्यक्ती एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतो. अनेक सरकारी अधिकारी, शिक्षक, डॉक्टर यांनी हे यापूर्वी अनेकदा दाखवून दिलं आहे. सोलापूरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरनं देखील याबाबत नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी आपलं काम चोख करत एका गरीब कुटुंबाला त्यांना माहितीही नसलेले पैसे मिळवून देण्यात मदत केली आहे.
नेमकं काय घडलं?
सोलापूरचे रवींद्र गायकवाड आणि त्यांच्या पत्नी शिल्पा हे सोलापूर रेल्वे स्टेशनमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी शिल्पा यांचं निधन झालं. त्यांच्या अकास्मिक निधनाचा गायकडवाड कुटुंबीयांना मानसिक धक्का तर बसलाच त्याचबरोबर आधीच बेताची असलेली त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली.
रवींद्र गायकवाड यांना चार मुलं आहेत. त्या मुलांसह ते एकाच खोलीत राहातात. या अडचणीच्या परिस्थितीमधून मार्ग कसा काढायचा? हा विचार करत असताना रवींद्र यांना पत्नीचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सातरस्ता शाखेत खातं होतं हे आठवलं. हे खातं बंद करुन त्यामध्ये असलेली थोडीफार रक्कम परत घेऊन जाऊ असा विचार त्यांनी केला.
'कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंचा संघर्ष संपेना! घरासाठी परवड सुरूच, Video
मॅनेजर ठरले देवदूत
रवींद्र यांनी स्टेट बँकेत पत्नीचं खातं बंद करण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी बँकेचे मॅनेजर विशाल गायकवाड यांना शिल्पा यांनी 2020 साली हे खातं सुरू करताना 436 रुपयांचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढल्याचं लक्षात आलं. शिल्पा यांच्या निधनानंतर त्यांना विम्याची 2 लाख रुपये रक्कम गायकवाड कुटुंबीयांना मिळेल, असं त्यांनी रवींद्र यांना सांगितलं.
रवींद्र यांना आपल्याला इतकी रक्कम मिळेल याची कोणतीही कल्पना नव्हती. बँक मॅनेजरच्या कर्तव्यदक्ष कारभारामुळे त्यांना ही माहिती झाली. रवींद्र यांनी सर्व कागदपत्र जमा करताच नियमानुसार तीन आठवड्यांमध्ये ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
रवींद्र यांना तीन मुली आणि मुलगा आहे. या चार मुलांमध्ये एकही अद्याप सज्ञान नाही. त्यांचे शिक्षण तसंच लग्नासाठी ही रक्कम मुलींच्या नावानं फिक्स डिपॉझिट करण्याचा सल्ला बँक मॅनेजर विशाल गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे या मुलींना योग्य वेळी या रकमेचा उपयोग करता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Solapur, State bank of india