सोलापूर 14 जानेवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूर जिल्ह्याचे ऋणानुबंध फार घट्ट आहेत. मुंबई नाशिक नागपूर या जिल्ह्याबरोबरच बाबासाहेबांचा सोलापूरशी सतत संपर्क होता. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा जरी बाबासाहेबांनी येवला मुक्कामी 1935 रोजी केली असली तरी एक मे 1914 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मुक्कामी त्यांनी आपला मनोदय धर्मांतराच्या संदर्भात व्यक्त केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात आजच्याच दिवशी (14 जानेवारी 1946) सोलापूरमध्ये एक विशेष प्रसंग घडला होता.
काय आहे प्रसंग?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 14 जानेवारी 1946 रोजी सोलापूर येथे सकाळच्या मद्रास मेलने आले. सकाळी सोलापूर नगरपालिका आणि जिल्हा लोकल बोर्ड या संस्थेच्या वतीने हरीभाई देवकरण हायस्कूलचे कै.रा.ब.मुळे स्मारक मंदिरात डॉक्टर बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले.
चैत्यभूमी, दीक्षाभूमीपाठोपाठ सोलापूरच्या 'प्रेरणाभूमी'ला आहे महत्त्व! पाहा Video
याप्रसंगी शहरातील प्रमुख व्यापारी डॉ. सरकारी अधिकारी आणि वकील यांच्यासह अनेक सोलापूरकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीस नगरपालिकेतर्फे देण्यात येणारे मानपत्र नगराध्यक्ष रा.ब. अब्दुलपुरकर यांनी वाचून दाखवले आणि जिल्हा लोकल बोर्डाचे मानपत्र बोर्डाध्यक्ष जी डी साठे यांनी वाचून बाबासाहेबांना अर्पण केले.
बाबासाहेबांचं उत्तर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मानपत्राला उत्तर देताना सोलापूरकरांचे आभार व्यक्त केले होते. 'मला मानपत्र अर्पण केल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. सोलापूर शहरात मी अपरिचित नाही. येथे मी बऱ्याच वेळा आलेलो आहे. राजकारण व समाजकारण याचा प्रचारही केलेला आहे. खरे पाहिले तर सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ सोलापुरातच मी रोवली.कै.रा.ब.मुळे यांनी अस्पृश्यांसाठी बोर्डिंग उघडले. त्यांचेच कार्य त्यांचे बंधू डॉक्टर भालचंद्र राव उर्फ काकासाहेब मुळे यांनी उत्तम प्रकारे चालवले आहे ही आनंदाची गोष्ट आहे,' असं उत्तर यावेळी बाबासाहेबांनी दिलं होतं.
'बाबासाहेबांनी आमच्यामध्ये एक स्वाभिमान जागवला आहे. आरे ला का रे म्हणायची हिम्मत बाबासाहेबांमुळे आज आमच्यात आलेली आहे. अनेक जुन्या वृत्तपत्रातील संदर्भ आणि बाबासाहेबांच्या साहित्यातील संदर्भ एकजूट करून बाबासाहेब आणि सोलापूर यांचे संबंध यावर मी संशोधन केले आहे. नव्या पिढीला बाबासाहेब आपल्या किती जवळचे होते हे कळावे आणि त्यातून प्रेरणा घेत शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मूलमंत्र खऱ्या आयुष्यात उतरवावा हा एकच प्रामाणिक हेतू आहे,' अशी भावना आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केली.
संदर्भ
- चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
( लेखक - दत्ता गायकवाड )
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समग्र भाषणे खंड क्रमांक 6
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचे ऋणानुबंध (संकलन - बी के तळभंडारे)
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र महाराष्ट्र शासन, खंड क्र - 22
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dr. Babasaheb Ambedkar, Local18, On this Day, Solapur