सोलापूर, 06 डिसेंबर : सोलापूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. या यात्रेत नंदीकोलला खूप महत्त्व असते. त्यामुळे या नंदीकोलच्या सरावाला सोलापुरात एकदा भक्तलिंग बोला हर्र ... शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय या जयघोषासह सुरुवात झाली आहे. हा सराव सकाळ आणि संध्याकाळ सुरु आहे.
कोणत्याही भाविकाला नंदीकोल पेलताना डोळ्यांवर सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी दोन तास आणि जे भाविक नवीन आहेत त्यांना सराव व्हावा यासाठी संध्याकाळी तीन तास असा सराव करण्यात येत आहे. यावर्षी हब्बू ,देशमुख,माळी समाज आणि कालिका देवस्थान समिती यांच्याकडे नंदीकोलचा मान दिला आहे.
मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी भरते खंडोबा यात्रा, पाहा काय आहे अख्यायिका video
कोरोना काळातील मागील दोन वर्ष वगळता येणारी यात्रा ही प्रत्येक सोलापूरकरांसाठी शुभाशीर्वाद घेऊन येईल. 1 डिसेंबर पासून आम्ही हा सराव सुरु केला आहे. साधारणपणे महिनाभर चांगला सराव केल्यानंतरच आमच्यामध्ये एक आत्मविश्वास येतो अशी भावना नंदीकोलचे सेवेकरी आणि मानकरी जगदीश श्रीकांत जवळे यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
नंदीकोल कसा तयार करतात?
- विशिष्ट बांबू या प्रकारातील एक मोठी आणि टिकाऊ काठी असते.
- त्याला आतून छिद्र पाडून त्यामध्ये तेल सोडले जाते. जेणेकरून ती काठी मजबूत आणि टिकाऊ व्हावी.
- काठीच्या निमुळत्या भागावर चमकीचा डोम उभा केला जातो. त्यावर सर्व साज आणि फुलांची सजावट केली जाते.
- या सर्व साज, फुलांची सजावट आणि बाशिंग बांधल्यानंतर काठीचे वजन जवळपास शंभर ते सव्वाशे किलो इतके होते.
- कमरेच्या भोवती पतोडा ( नंदीकोल पेलण्यासाठी दोरी पासून तयार केलेला विशिष्ट कमरेचा पट्टा ) गुंडाळून त्यामध्ये नंदीकोल ठेवून कमरेवरच बॅलन्सिंग करत भक्ती भावाने शहरातील सर्व 68 लिंग भोवती यांची प्रदक्षिणा निघते.
- अत्यंत जबाबदारीचे आणि अवघड असणारे हे कमरेवर नंदीकोल पेलण्याचे आव्हान सर्व भाविक मोठ्या भक्ती भावाने स्वीकारतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.