सोलापूर, 12 नोव्हेंबर : स्ट्रीट फूडच्या बाबतीत सोलापूर देखील आता मागे राहिले नाही. हिवाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या गरमा-गरम पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. सोलापूरमध्ये काही असे स्ट्रीट फूड मिळतील जे पाहताच तुम्ही स्वतःला खाण्यापासून थांबवू शकणार नाही. त्यातील एक फेमस स्ट्रीट फूड म्हणजे आंध्र भजे. सोलापूरकर या स्ट्रीट फूडचा आवडीने आस्वाद घेतात.
मिलमध्ये काम करणारे हरिदास कोंडा यांची नोकरी गेली. कुटुंब चालण्यासाठी 1992-93 साली त्यांनी थेट हैदराबाद गाठले. हैदराबाद येथील पोटीबाजार येथे एका छोट्या हॉटेलमध्ये ते काम करू लागले. वेटरचे काम करणारे हरिदास आंध्र भजी कशी बनवावी हे शिकले. आणि 1997 साली सोलापुरातील पूर्व विभाग महेश आंध्र भजी या नावाने हॉटेल सुरू केले.
मूकबधीर जोडप्याचा पाणीपुरी स्टॉल, नाशिककरांचा बनला प्रेरणास्थान! Video
गेल्या पंचवीस वर्षांपासून हरिदास यांची मुले महेश आणि रमेश मोठ्या कष्टाने हॉटेल चालवत आहेत. या हॉटेलात प्रामुख्याने आंध्र भजी, वडापाव, स्पेशल मुग हरभरा डाळ हे तीन प्रकार प्रसिद्ध आहेत. यांची अनुक्रमे किंमत वीस रुपये असून वडापाव दहा रुपयाला मिळतो.
आंध्र भज्याची सुरुवात आम्ही केली
सोलापुरात इतरही ठिकाणी आंध्र भजी मिळतात. परंतु, आम्ही सर्वात पहिले सोलापुरात आंध्र भजी बनवण्यास सुरुवात केली. आम्ही सुरुवातीपासून एकच चव कायम ठेवल्याने आमचा खवय्यावर्ग टिकून आहे. शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे हे सोलापूरचे आयुक्त असताना ते आवर्जून ही भजी खात असत. तसेच बालाजी अमाईन्स या जगप्रसिद्ध कंपनीचे राम रेड्डी हे सुद्धा येथील भजी खात होते असे रमेश सांगतात.
असे बनतात आंध्र भजे
भजी बनवताना बेसन, सोडा, ओवा, मीठ आणि पाणी यांचे योग्य मिश्रण घेऊन ती बटाटा किंवा मिरचीमध्ये डीप करून तळले जातात. परंतु, आंध्र भजीसाठी वापरली जाणारी मिरची हैदराबाद येथून मागवली जाते. ती मिरची चिरून त्याच्यामध्ये चिंच आणि इतर मसाला भरला जातो. साधारणपणे एक ते दोन तास हा मसाला मिरचीमध्ये चांगला मुरेपर्यंत मॅरीनेट केला जातो. या मसाल्यामुळे मिरचीचा मूळ तिखटपणा कमी होतो. मिरची बेसन आणि पाण्याच्या मिश्रणात बुडवून तळली जाते. या मिरची भजीसोबत विशिष्ट खट्टा-मीठा चटणी दिली जाते. ज्यामुळे या भज्याची चव अगदी खमंग होते. मुग हरभरा डाळ भजी देखील येथील खासियत आहे.
पत्ता
जोडबसवण्णा चौकातून शांती चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर सेंट्रल बँकेजवळ, सोलापूर. महेश कोंडा संपर्क क्रमांक 99219 03401.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.