सोलापूर, 31 जानेवारी : सोलापूर-विजयपूर महामार्गार काही दिवसांपूर्वी उड्डाणपूलारुन कोसळून 12 काळवीट आणि हरणांचा जागीच मृत्यू झाला. केगाव बायपासजवळच्या उड्डाणपुलावरुन हे सर्व जण कोसळले होते. यामध्ये तीन प्राण्यांवर पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोलापूरमध्ये या प्रकारे झालेली ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील याच परिसरात अनेकदा हरणांचा अपघात झाला आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून त्याचे उत्तर वन विभागाला द्यावं लागेल. नेमकं काय घडलं? हिरज माळरानावरून सोलापूर शहराच्या जवळ असलेल्या शिवाजी नगर परिसरात 15 काळवीट आणि हरणांचा कळप येत होता. त्यावेळी मागून येणाऱ्या वाहनाला किंवा पाठलाग करणाऱ्या कुत्र्याला घाबरुन या कळपाने उड्डाण पुलावरुन खाली उडी मारली. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी एक हरिण जखमी अवस्थेमध्ये पुढं निघून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली. या दुर्दैवी घटनेला नेमके जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. या प्रश्नाचं उत्तर आगामी काळात वनविभागाला द्यावं लागणार आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) काय उपायोजना करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. काय आहे कारण? वन्य जीवाचा अधिवास असलेल्या या भागात या प्रकारचे अपघात सातत्याने होत आहे. विशेषत: महामार्गावरील पुलांच्या ठिकाणी जिथं डोंगर फोडून रस्ता तयार केलाय त्या परिसरात या घटना घडतात. सांगोला, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, विजयपूर अशा अनेक राष्ट्रीय महामार्गावर ही परिस्थिती आहे. बैलगाडीनंतर समृद्धी महामार्गावर धावले हरीण, Video Viral वन विभागानं त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) अनेकदा पत्रव्यवहार केला. पण, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अपघातात अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. आता वन विभाग पुन्हा एकदा ‘एनएचएआय’ला त्यासंबंधीचे पत्र देईल. आम्हीही त्यादृष्टीने उपाययोजना करू, अशा दुर्देवी घटना टाळण्याचा त्यातून प्रयत्न करू, असं आश्वासन उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलं. वाईल्डलाईफचे अधिकारी तुषार चव्हाण यांच्याकडं या विभागाचा चार्ज आहे. या प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून या संदर्भात काही ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एनएचआयच्या अधिकाऱ्यांशा याबाबत सुरू असलेला पत्रव्यवहार अंतिम टप्प्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
सर्वसामान्य नागरिक, वन्यसंरक्षक अधिकारी आणि मानद वन्यजीव संरक्षक भरत छेडा यांनी या हे प्रकार थांबवण्याचे काही उपाय सांगितले आहेत. - राज्य सरकारनं उड्डाणपुलाच्या तिथं होणारे अपघात लक्षात घेऊन त्यावर बॅरिगेट्स लावणे आवश्यक आहे. -महामार्ग नियोजन अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून रस्त्यावर ठिकठिकाणी वन्यजीव संरक्षणाच्या पाट्या लावाव्यात - हरणांच्या पारंपारिक मार्गांवर कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. -अन्नसाखळीतील बदलांचा अभ्यास करावा. हरणांना त्यांचे ठिकाण सोडण्याची वेळ का येत आहे या विषयावर संशोधन करणे आवश्यक आहे. -प्रशासनानं कोणत्याही ठोस उपाययोजना नैसर्गिक पद्धतीनंच कराव्यात -वनविभागाचं एक पथक या परिसरात कायम तैनात असावं