सोलापूर, 11 जून : कोरोनामुळे जगभरात अनेक घटना अनुभवायला येत आहेत. त्यातच सोलापुरातून एक घटना काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीला कोरोना झाल्याच्या भीतीमुळे पतीने चक्क आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरातील न्यू बुधवार पेठ येथे राहणाऱ्या अभिमन्यू कसबे यांनी आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
महापालिकेच्या सफाई कर्मचारी असलेल्या शारदाबाई कसबे यांना ताप आल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पती अभिमन्यू कसबे हे बेचैन झाले. ते सातत्याने आपल्या नातवाला फोन करुन शारदा कशी आहे अशी विचारणा करत होते. त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये भेटायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांना भेटता येणार नसल्याचे सांगितल्याने ते अधिक बेचैन झाले.
पत्नीची काळजी लागलेल्या आणि तिच्या पासून दूर असलेल्या अभिमन्यू कसबे यांनी अखेर आपल्या राहत्या घरी सकाळी साडेसहा वाजता नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली.
हेही वाचा - 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' अभिनेत्याचं निधन
दरम्यान, घटनेची माहिती जोडभावी पेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली असून ते पुढील प्रक्रिया करत आहेत. गळफास घेतल्यानंतर अभिमन्यू कसबे यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. मात्र ज्या रुग्णालयात पत्नीला उपचारासाठी दाखल केले होते त्याच रुग्णालयात आपल्या पतीचा मृतदेह आला आहे, याची कल्पनाही पत्नी शारदाबाई यांना नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या महामारीमुळे मृत्यू झाल्याच्या आणखी एका घटनेत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.