सिंधुदुर्ग, 15 मे : लॉकडाऊनचे तीन टप्पे संपत आले तरी गावाकडे चालत निघालेल्या मजुरांचे हाल काही थांबत नाहीत, असं चित्र आहे. गोव्यात रोजंदारीवर काम करणारे शेकडो मजूर गोव्यात थारा मिळत नाही म्हणून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार या आपापल्या राज्यांकडे रोज चालत निघत आहेत .पण सिंधुदुर्गात आल्यावर प्रशासनाकडून त्यांना पुन्हा मागे परतण्यास सांगण्यात येत आहे.
एकतर गावी परतण्यासाठी या मजुरांना ट्रेन किंवा बसेसची व्यवस्था नाही. म्हणून ते चालत निघाले की त्यांना पोलीस अडवत आहेत आणि मागे पिटाळतात. अशा परिस्थितीत अन्नपाण्याविना मजुरांची ही फरफट सुरुच असून आम्हाला गाड्यांची व्यवस्था नको पण चालत चालत तरी आमच्या राज्यात जाऊ द्या, एव्हढीच माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अद्यापही रोज असे शेकडो मजूर गोव्यातून आपापल्या राज्यात पायी जात आहेत . गोवा सरकारने मात्र अशा मजुरांना थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले नसल्याचंच मजुरांच्या या स्थलांतरावरुन दिसून येत आहे.
रात्रंदिवस भुकेल्यापोटी मजुरांचा प्रवास
14 मे ला सिंधुदुर्गातून कर्नाटकला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनमधून 1400 प्रवाशांना कर्नाटकला पाठवण्यात आलं. त्याच दिवशी गोव्यातल्या पेडणे गावातून चालत मध्य प्रदेशला जाणारे 100 मजूर सिंधुदुर्गात आले. मजुरांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांना सावंतवाडी तहसिलदारांकडे पाठवले . तिथून त्यांना कुडाळमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होईल, असं सांगण्यात आले . कुडाळमध्ये त्यांना कोणतंच प्रशासन थांबवून घेईना. मग ते तसेच उपाशी चालत रात्री कणकवलीला पोहोचले.
कणकवली पोलिसांनी त्यांना पुन्हा त्याच रात्री कुडाळची वाट धरण्यास सांगितली. पोलीस मारतील आणि गुन्हे दाखल करतील, या भीतीने बिचारे मजूर पुन्हा माघारी निघाले. पुन्हा कुडाळमध्ये आल्यावर हे मजूर म्हणाले की " पावसात रात्रभर उपाशीपोटी चालून चालून आमच्या पायाची सालं गेलीत साहेब. एकतर आम्ही तीन रात्र चालतोय गोव्यातून. आमचे ठेकेदार ना आता आम्हाला थांबवून घेत ना आता आमच्याकडे काही पैसे उरलेत. पाया पडतो तुमच्या, भले आम्हाला काही देऊ नका खायला, पण आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या साहेब, अडवून ठेऊ नका!"
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown, Sindhudurg