सिंधुदुर्ग, 20 सप्टेंबर : कोकणात नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटू लागला आहे. कारण या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचे नेते आमने-सामने आले आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प होणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर भाजपचे माजी आमदार, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी शिवसेनेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
'महाविकास आघा़डीचे सरकार पडेल, पण रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही. भाजपची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसूचना निघेल. ज्या दिवशी भाजपची सत्ता येईल, देवेंद्र फड़णवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी याबाबतचा निर्णय होईल,' असं प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे.
दीड लाख लोकांचा रोजगार शिवसेनेने हिरावून घेवू नये असंही प्रमोद जठार यावेळी यांनी यावेळी सांगितले.
काय आहे शिवसेनेची भूमिका?
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच नाणार प्रकरणात शिवसेनेची भूमिका ठामपणे सांगितली होती. राऊत यांनी पुन्हा एकदा नाणार रिफायनरी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश भूकंपप्रवण क्षेत्राच्या रेड कॅटॅगरीमध्ये केला गेल्यामुळे नाणार रिफायनरी आणि जैतापूर अणुउर्जा प्रकल्पही रत्नागिरीत होणार नसल्याचं राऊत म्हणाले. तरीही जे कुणी शिवसैनिक असल्याचं सांगत रिफायनरीला आपल्या जमिनी देण्यास संमती देत आहेत, ते भूमाफियांचे दलाल असून त्यांची कोणतीही दखल मुख्यमंत्री घेणार नसल्याची तिखट प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.