Home /News /maharashtra /

रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णाच्या पत्नीची उपचारासाठी 8 दिवस वणवण

रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णाच्या पत्नीची उपचारासाठी 8 दिवस वणवण

आठ दिवसांपासून उपचारासाठी वणवण करावी लागत असल्याची व्यथा या महिलेने मांडली आहे.

कल्याण, 20 जून : कल्याण पूर्वेतील नांदिवली भागात राहणाऱ्या एका महिलेच्या पतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने गरीबाने उपचारासाठी जायचे कुठे? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. आज त्यांच्या पतीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. आठ दिवसांपासून उपचारासाठी वणवण करावी लागत असल्याची व्यथा या महिलेने मांडली आहे. रुग्णवाहिकांच्या असुविधांमुळे केडीएमसी चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाहिणीच्या दिरंगाईमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागला होता. हे प्रकरण ताज असतानाच आता कल्याण पूर्वेतील एक रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महिलेचे पती हे रिक्षा चालक आहे. 24 मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाल्यापासून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून रिक्षा चालकांना मदतीचा हात मिळालेला नाही. अशा परिसरात पती पत्नी व त्यांचा एक मुलगा कसेबसे दिवस काढत असताना त्यांच्या पतीला आठ दिवसापूर्वी त्रास जाणवू लागला. त्यांनी खाजगी रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांच्या जवळच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. डॉक्टरने त्यांच्या पतीला कोरोनाची लक्षणे असल्याचे सूचित केले. त्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट त्यांना दोन दिवसांनी हाती पडला. पालिका प्रशासनाकडे त्यांनी मदत मागितली. त्यांच्या पतीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना व त्यांच्या मुलाला क्वारन्टाइन करण्याची मागणी केली. तरी देखील प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एका डॉक्टराने त्यांना सांगितले शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात बेडची संख्या कमी आहे. त्याठिकाणी उपचारासाठी दाखल जरी केले गेले तरी योग्य ती काळजी घेतली जाईल की नाही या विषयी काही एक हमी देता येत नाही. अखेरीस या महिलेच्या पतीने कोरोना असताना देखील स्वत:च रिक्षा चालवून कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील एका खाजगी रुग्णालय गाठले. त्याठिकाणी तिच्या पतीला दाखल करुन घेण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी त्या महिलेची भेट घेतली. घडलेला प्रकार जाणून घेतला. दरम्यान आमदार गायकवाड यांनी महिलेची व्यथा ऐकल्यावर महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. एखाद्याला कोरोनाची लक्षणे आढळून आली असतील तर त्या रुग्णाला तातडीने क्वारंटाइन केले पाहिजे. त्याची चाचणी करुन तातडीने त्याचा रिपोर्ट उपलब्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले पाहिजेत. कुटुंबीयांना रुग्णासोबत आठ दिवस वणवण करावी लागली. त्यांचा अन्य लोकांशी संपर्क आला. 'रुग्णांची वणवण थांबविली नाही तर कोरोना संपर्कातून आधिक वाढणार आहे. त्याला सर्वस्वी महापालिकेचे प्रशासनच जबाबदार आहे. सामान्यांसाठी उपचाराकरीता बेड उपलब्ध करुन दिले जात नसतील. तर त्यांनी जायचे कुठे?  वशिला लावणाऱ्या लोकांना जागा उपलब्ध करून दिले जातात मग गरिबांना जागा उपलब्ध का नाही?' असा सवाल पीडितांकडून उपस्थित केला जात आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Coronavirus, Kalyan

पुढील बातम्या