फडणवीस-ठाकरे वाद पुन्हा चिघळला, अमृता फडणवीसांच्या प्रत्युत्तरानंतर शिवसेनेचा हल्लाबोल

फडणवीस-ठाकरे वाद पुन्हा चिघळला, अमृता फडणवीसांच्या प्रत्युत्तरानंतर शिवसेनेचा हल्लाबोल

अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. त्यानंतर शिवसेनेनंही अमृता फडणवीस यांना फटकारलं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेतील ट्विटरवर सुरू झालेलं शाब्दिक युद्ध संपताना दिसत नाही. अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केल्यानंत शिवसेनेनं अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध 'जोडे मारो' आंदोलन केलं. या आंदोलनावरूनही अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. त्यानंतर शिवसेनेनंही अमृता फडणवीस यांना फटकारलं आहे.

'गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करण्यासाठी अनेकदा संधी दिली. पण शिवसेनेने कधीही वैयक्तिक टीका केली नाही. कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा. देवेंद्र फडणवीस यांचे पण हेच मत असल्याचे समजते,' असा खोचक टोला युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.

'उद्धव ठाकरे, लोकांना मारून तुम्ही नेतृत्व करू शकत नाही. तो हल्ला आहे, नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !', असं म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या 'जोडे मारो' आंदोलनाला उत्तर दिलं होतं. त्यावर आता शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांना खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

फडणवीस Vs ठाकरे वाद उफाळला

अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांची ट्विटरवरची सक्रियता जास्तच वाढली असून त्यांनी आता थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.

'फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीका,' अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

शिवसेनेकडून 'जोडे मारो'

अमृता फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने शिवसेना आक्रमक झाली. पिंपरी चिंचवडमध्ये अमृता फडणवीस यांच्या फोटोलो जोडो मारो आंदोलन करत शिवसेना महिला आघाडीतील पदाधिका-यांनी आंदोलन केलं होतं. तर अशा टीका थांबवा अन्यथा घरात घुसून मारू अशा शब्दात शिवसेनेकडून धमकी देण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 09:45 AM IST

ताज्या बातम्या