Home /News /maharashtra /

एका वर्षात दोनदा 'सुतक' लागणं हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही, शिवसेनेचा भाजपला टोला

एका वर्षात दोनदा 'सुतक' लागणं हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही, शिवसेनेचा भाजपला टोला

वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपला सुतक लागलं आहे. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवानं आणखी एक सुतक लागलं आहे.

    मुंबई, 5 डिसेंबर: 'महाविकास आघाडीचं सरकार है अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही', असं बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीदारांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावं. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपला सुतक लागलं आहे. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवानं आणखी एक सुतक लागलं आहे. एका वर्षात दोनदा सुतक लागणं हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही, भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून शिवसेनेनं (Shiv sena) भाजपला (Bjp) खोचक टोला लगावला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीदार मतदारसंघातील 6 जागांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यापैकी पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या तर केवळ एकच जागा भाजपला जिंकता आली. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू, असं म्हणाले भाजपचे चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil) यांच्यावरही शिवसेनेनं जोरदार निशाणा साधला आहे. हेही वाचा...हिंमत असेल तर...शेतकऱ्यांबाबत केलेल्या ट्विटनंतर कंगना रणौतला खुलं चॅलेंज पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलं होतं. हिंमत असेल तर एकट्यानं लढा, असे ते म्हणाले होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या आव्हानलाही शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखानुसार, महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. शिक्षक, पदवीधरांनी महाराष्ट्रात सर्वत्र महाविकास आघाडीलाच मतदान केले. सर्वात धक्कादायक निकाल नागपूरचा आहे. गेल्या पाच दशकांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पक्ष विजयी होत आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरच्या पदवीधरांचे प्रतिनिधित्व पंचवीसेक वर्षे केले, पण त्याआधी गंगाधरपंत फडणवीस हे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू संघ नेते नागपूरकर पदवीधारकांचे नेतृत्व विधान परिषदेत करीत होते. सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गंगाधरपंतांचे सुपुत्र. त्यामुळे हा मतदारसंघ किती संघमय झाला होता ते कळेल. संघाचे मुख्यालय नागपुरात आहेच, पण संघ विचारी लोकांचे संघटन मजबूत असताना नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे अभिजित वंजारी येथे विजयी झाले, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. कारण विधानसभा निवडणुकांतच नागपुरातील दोन जागा भाजपने गमावल्या व उरलेल्या तीन जागांवर भाजपचा निसटता विजय झाला होता. हे चित्र काय सांगते? बालेकिल्ल्यास सुरुंग लागलेच होते, आता पायाच खचला. त्यामुळे भाजपनेही फार मनास लावून घेऊ नये. अमरावती शिक्षक मतदारसंघातही भाजप मागे पडला आहे. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच सतीश चव्हाण मोठ्या मताधिक्याने जिंकले. पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. पुणे पदवीधरसुद्धा भाजपचाच गड होता. अनेक वेळा तेथे प्रकाश जावडेकर विजयी होत. नंतर सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत असतानाच ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष झाले. विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी कोल्हापुरातून पुण्यात आले व आता त्यांच्याच नेतृत्वाखाली पुण्याचा पदवीधर मतदारसंघ भाजपने गमावला. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातही भाजप पराभूत झाला. पुणे पदवीधर, शिक्षक हा तसा पांढरपेशांचा मतदारसंघ पण बहुधा सदाशिव पेठ, कसबा पेठ, कोथरूड, नाना पेठ, डेक्कन परिसरांतील मतदारांनीही चंद्रकांतदादांच्या आवाहनास झिडकारलेले दिसते. कोल्हापूर, सातारा, सांगलीचा तर प्रश्नच येत नाही, असे एकंदरीत मतदान झालेले दिसले. आता चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी एकत्र लढली यापेक्षा एकदिलाने लढली हे महत्त्वाचे. भाजप-शिवसेना एकत्र लढत होते तेव्हा शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून धडा घ्यायचा आहे तो भाजपने. नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल आहे. वाऱ्याने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे. नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच आहे. नागपुरातील विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. आधीचे उमेदवार नितीन गडकरी यांना मानणारे होते. जोशी हे फडणवीस कंपूचे. नागपुरातील दोन कंपूत भाजप फुटला आहे हे कटुसत्य आहेच. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही, अशी वचवच सुरू आहे. लाखो शिक्षक व पदवीधरांनी दिलेले मत कौल नसेल तर मग ईव्हीएम घोटाळ्यातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय? पुणे व संभाजीनगरचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लाखावर मतांनी जिंकले आहेत. शिक्षक मतदारसंघात 50 हजारांवर मतांनी जय झाला आहे. विदर्भातील विजय त्यादृष्टीने जास्त महत्त्वाचा. काँग्रेसचे सर्व गट-तट, नेते मंडळी एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतो ते दिसले. हेही वाचा...हैदराबाद: ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुललं, भाजप दुसऱ्या स्थानावर या विजयातून दिल्लीतील मरगळलेल्या काँग्रेस हायकमांडनेही बोध घ्यायला हवा. भाजपचे गड एकजुटीने पाडले जाऊ शकतात. महाराष्ट्रात ते दिसले. महाराष्ट्रातील भाजप लोकांपासून, समाजातील सर्वच घटकांपासून दूर जातो आहे. पक्ष संघटना अंतर्गत कलहाने जर्जर झाली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या हाती भाजपची सूत्रे आहेत. ही दिल्लीश्वरांची इच्छा, पण जनतेची इच्छा काय ते नागपूर, पुणे, संभाजीनगरच्या पदवीधर व शिक्षकांनी दाखवून दिले आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातही ‘जात’ हाच आधार मानून उमेदवाऱ्या दिल्या. भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली. महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. ‘‘आम्हीच येणार व आम्हीच जिंकणार’’ हा तोरा बरा नाही. ‘‘विधान परिषदेच्या सहापैकी सहा जागा जिंकू’’, अशा आरोळय़ा चंद्रकांत पाटील ठोकत होते. शरद पवार हे लोकनेते नाहीत असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा लोकांनीच त्यांना खाली पाडले. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: BJP, Maharashtra, Shiv sena, Udhav thackeray

    पुढील बातम्या