मुंबई, 22 ऑगस्ट : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अर्थात पीएमएलए (PMLA) अंतर्गत आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) संजय राऊत पुस्तक लिहित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी इडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. नियमानुसार सुनावणी सुरू असलेल्या प्रत्येक कैद्याला पेन, पेपर यासारख्या वस्तू लिहिण्यासाठी दिल्या जातात. याआधी संजय राऊत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनासाठी संपादकीय लिहित असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. यानंतर संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख सामनामध्ये करण्यात आला नाही. रविवारी येणाऱ्या रोखठोक या संजय राऊत यांच्या सदरही हल्ली केदारनाथ मुंबईकर या नावाने लिहिलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत पत्रा चाळ प्रकरणावरच पुस्तक लिहित आहेत. मुख्य म्हणजे याच प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं राऊत आधीच म्हणाले आहेत. 1 ऑगस्टला संजय राऊत यांना इडीने मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत इडीकडे संजय राऊत यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्याची वेळ आहे. दरम्यान इडीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या विशेष सरकारी वकील कविता पाटील यांनी संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यासाठी सोमवारी रिमांड ऍप्लिकेशन फाईल केलं. इडीला संजय राऊत यांची आणखी चौकशी करायची असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. यानंतर पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांची कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. संजय राऊत यांची बाजू मांडणाऱ्या वकील विक्रांत साबणे यांनी पुढच्या सुनावणीवेळी आम्ही जामीन अर्जाची मागणी करू, असं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.