सत्ता स्थापनेबाबत सेनेची डरकाळी, 'आता जे काही होईल ते...'

सत्ता स्थापनेबाबत सेनेची डरकाळी, 'आता जे काही होईल ते...'

राज्यात सत्ता स्थापनेबाबत अद्याप कोणतीही हालचाल नसली तरी भाजप-शिवसेना यांच्यात 50-50 फॉर्म्युला अडसर ठरत आहे. यातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची स्वतंत्र भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील सत्तेत अर्धा वाटा मागत शिवसेनेनं भाजपवर दबाव टाकला आहे. युतीला बहुमत मिळालं असून शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहे. यामुळे अद्याप सरकार स्थापनेवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. यातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे राज्यपालांची बेट घेतली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, आम्हाला दिलेला शब्द भाजपला पाळावा लागेल असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच राज्यातील सद्यस्थितीची माहिती राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी दिली. दुसरीकडे राज्यात सत्तेसाठी भाजप-सेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही पक्ष बंडखोर आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धावाधाव करत आहेत.

राज्यात 50-50 फॉर्म्युल्यानुसार भाजपसोबत सरकार स्थापन करण्याबाबत राऊत म्हणाले की, भाजप आणि आमच्यात हे ठरलं आहे. तो समजून घ्यायला हवा. त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं होतं. त्यापासून ते मागे हटू शकत नाहीत. आता जे काही होईल ते लिखित होईल असंही राऊत म्हणाले.

युतीचं सरकार येणार असलं तरी त्यातही सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर म्हटलं होतं. दरम्यान, 15 बंडखोर आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं.

भाजप आणि शिवसेना यांच्यातच आता बंडखोर आणि अपक्षांना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. आतापर्यंत सेनेला चार आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर आतापर्यंत तीन नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मीरा भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांच्या पाठोपाठ अपक्ष आमदार रवी राणा आणि राजेंद्र राऊत यांनीही भाजपला पाठिंबा दिला.

सत्ता स्थापनेच्या खेळात आता बंडखोर आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारला असून दोन्ही पक्ष त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी कामाला लागले आहेत. निवडणुकीआधी बंडखोरांना युतीत स्थान दिले जाणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता. मात्र, आता निकाल लागताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत 15 बंडखोर संपर्कात आहेत असं सांगितलं होतं.

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण, म्हणाले...

First Published: Oct 28, 2019 02:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading