• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • शिवसेना खासदार संजय जाधव यांना मारण्याचा कट, दिली होती 2 कोटींची सुपारी

शिवसेना खासदार संजय जाधव यांना मारण्याचा कट, दिली होती 2 कोटींची सुपारी

शिवसेना खासदार संजय जाधव यांना मारण्याचा कट उघड झाला आहे.

  • Share this:
परभणी, 28 ऑक्टोबर: शिवसेना खासदार संजय जाधव यांना मारण्याचा कट उघड झाला आहे. खासदार जाधव यांनी जीवे मारण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला 2 कोटींची सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे दोन व्यक्तींच्या चर्चेतून हा प्रकार उघड झाल्याची माहिती मिळाली आहे. खासदार जाधव यांनी या प्रकरणी परभणीच्या नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हेही वाचा...7 महिन्यानंतर सर्वांसाठी धावणार मुंबईची 'लाइफलाइन'? ठाकरे सरकारचे संकेत नांदेडमधील रिदा गँगला मला हत्या करण्यासाठी 2 कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचं खासदार संजय जाधव यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले. परभरणीमधील एका मोठ्या व्यक्तीकडून ही सुपारी देण्यात आल्याचा दावा संजय जाधव यांनी केला आहे. संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून संपूर्ण माहिती घेतल्यानंरच गुन्हा दाखल केला जाणार आहे. अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान, खासदारांना ठार मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती नेमका कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे. दिला होता खासदारकीचा राजीनामा... संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा दिला होता. संजय जाधव यांनी पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली होती. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: