मुंबई, 26 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा आता लांबणीवर गेला आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांना मुदतवाढ मिळाली आहे. खुलासा किंवा उत्तर देण्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आमदार अपात्रतेसाठी शिवसेनेच्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुदतवाढ दिली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर आता विधिमंडळ अधिवेशनानंतर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना नुकतीचं नोटीस दिली होती. मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागितला. त्यानुसार राहुल नार्वेकरांनी 40 आमदारांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. खरं तर आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने यापूर्वीचं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्या याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. एकीकडे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी 40 आमदारांना नोटीसला उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंड झालं. त्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टानं निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना रिझनेबल वेळेत निर्णय देण्याचा आदेश दिला होता. मात्र त्याला अडीच महिन्यांहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. त्यामुळेचं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं विधानसभा अध्यक्षां विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सुप्रीम कोर्टानं संबंधितांना नोटीस बजवली आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी दोन्ही शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती, मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील आमदारांनी नोटीसला उत्तर देण्यास वेळ वाढवून मागितली आहे. आता विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिल्यामुळे, या प्रकरणी निर्णय येण्यास आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.