मुंबई, 25 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. तर दुसरीकडे, आता बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला चढवला आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयात फोडण्यात आले आहे. पण, औकातीत राहा, एकदा हा राजकीय तिढा सुटल्यावर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला. आज सकाळी शिंदे समर्थक आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पुण्यातील कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली. पुण्यातील बालाजी नगर भागात सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यालय आहे. या कार्यालयाला शिवसैनिकांनी लक्ष्य केलं. या तोडफोडीनंतर तानाजी सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट करून शिवसैनिकांचा इशारा दिला. आमचे गटनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं, असा इशाराचतानाजी सावंत यांनी दिला. आज सकाळी शिंदे समर्थक आमदारांना धडा शिकवला जाईल असा इशारा काही शिवसेना नेत्यांनी यापूर्वी दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यलयावर हल्ला केला.
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे pic.twitter.com/k2y7dVzupT
— News18Lokmat (@News18lokmat) June 25, 2022
सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे, आता संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.