जळगाव, 4 नोव्हेंबर : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा रद्द झाल्या आहेत. आदित्य ठाकरे यांची सभा औरंगाबाद जिल्ह्यात होणार होती. तर सुषमा अंधारे यांची सभा ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे होती. या दोन्ही सभा रद्द करण्यात आल्या आहेत. यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे काम मी करायला आले होते, ते काम मी फत्ते केले. सत्तेचा गैरवापर करत दंडेलशाही व दादागिरी करत मुक्ताईनगरची सभा रद्द केली. मात्र, तरुणांनी फेसबुक पेजवरून घराघरात पोहोचवली, असं अंधारे म्हणाल्या. ..तर माझ्याकडे लोकांचं प्रेम आहे : सुषमा अंधारे जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारेंची सभा होती. तर याचठिकाणी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सभा होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात कलम 144 लागू करत या दोन्ही सभांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही सभा रद्द करत असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटलांवर आधीच गद्दारीचा शिक्का बसला आहे. मात्र, आता जी काही थोडीफार होती ती घालवली आहे. तीन महिन्याच्या बाळाला गुलाबराव पाटील इतके घाबरतील असं मला वाटलं नव्हतं. गुलाबराव पाटलांनी आज जो प्रकार केला तो निश्चितपणे जळगावकरांना आवडला नाही, असंही अंधारे म्हणाल्या. वाचा - आदित्य ठाकरे, सुषमा अंधारेंची सभा रद्द; शिवसेना उपनेत्याचा गृहमंत्री फडणवीसांवर जोरदार प्रहार संघर्ष टोकाचा आहे. पण इरादे नेक हो, मंजिले तय हो, हौसले बुलंद हो तो कामयाबी कदम चुमते हुई आता है. आमच्याकडे सैन्यबळ किती आहे. कुमक किती आहे, यापेक्षाही माझ्याकडे लोकांचं प्रेम, पाठींबा आणि संविधान आहे. गुलाबराव कितीही म्हणत असतील ‘मेरे पास पोलीस है, सत्ता है, भाजप है, तो मेरे पास लोगो का प्यार है, असं डायलॉग बोलत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे.
सत्तेचा गैरवापर : सुषमा अंधारे सरकारकडून मुक्ताईनगरमधील नियोजित सभेवर आकसबुद्धीनं, सत्तेचा गैरवापर करत, दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे वाईट आहे. आमच्या सभेत असंविधानिक काहीही होणार नाही, आम्ही अत्यंत संयत भाषेत फक्त आणि फक्त कायदा काय आहे, महापुरुषांचा विचार काय आहे, संतवचन काय आहे, महाराष्ट्र कशा पद्धतीनं जोडता येईल तसेच महाराष्ट्राच्या समस्या काय आहेत? या संबंधानं फक्त लोकांशी जाऊन बोलत आहोत. ही घटनेची पायमल्ली आहे. पोलिसांना ग्रामीण भागात सभेमुळे वातावरण बिघडेल असे वाटत असेल तर त्यासाठी पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पण ते त्यांच्याकडून होत नसेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरत आहेत. त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही, अशा शब्दांत अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.