'...आता आग लावली नाही म्हणजे झालं', नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर शिवसेनेचा घणाघात

'...आता आग लावली नाही म्हणजे झालं', नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर शिवसेनेचा घणाघात

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाच्या बाजूने आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • Share this:

मुंबई, 3 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता देशाला संबोधित करत लोकांना एक आवाहन केलं. '5 एप्रिलला सगळ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र यायचं आहे. 130 करोड देशवासियांच्या शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे. मला रात्री 9 वाजता सगळ्यांचे 9 मिनिट हवी आहेत. यावेळी आपण घरातील सगळ्या लाईट बंद करू आणि सगळे घराच्या दारात उभे राहून मेनबत्ती, दिवा, मोबाईलची लाईट लावू. या वेळी घरातील सर्व लाईट बंद असतील. तेव्हा प्रकाशाच्या या महाशक्तीचा जागर होईल आणि सगळ्यांची एकता दिसेल,' असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाच्या बाजूने आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

'टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं. साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलां,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. यावेळी राऊत यांच्या बोलण्याचा रोख जनता कर्फ्यूवेळी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या उद्दिष्टाला हरताळ फासत रस्त्यावर केलेल्या गर्दीकडे होता.

बाळासाहेब थोरातही झाले आक्रमक

राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात हेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. 'थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं पंतप्रधानजी हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला,' अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

रोहित पवारांकडून मात्र स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. 'भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असताना राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र मोदींच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

First published: April 3, 2020, 5:37 PM IST

ताज्या बातम्या