पंढरपूर, 09 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारला (mva government) दोन वर्ष पूर्ण झाले आहे. पण अजूनही आमदारांचे नाराजीसत्र सुरूच आहे. ‘माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. घर की कोंबडी दाल बराबर असं झालंय’ असं म्हणत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (shiv sena mla shahaji bapu patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसंच, आपण भाजपच्या (bjp) पाठिंब्यावर निवडून आलो, असा गौप्यस्फोटच पाटील यांनी केला. राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार पाटील यांनी देखील आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली. पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. सांगोला तालुक्यात शिवसेनेला फक्त ११०० मते मिळाली होती,पण भाजपच्या पाठिंब्यावर मी निवडून आलो, आमदार झालो. खासदार रनजित निंबाळकर यांच्यामुळेच मला आमदारकी मिळाली. भाजपचे माझ्यावर चांगले लक्ष होते. कुठे काही कमी पडते का, याबद्दल विचारणा करण्यासाठी त्यांचा फोन येत होता, असा गौप्यस्फोट पाटील यांनी यावेळी केला. तसंच, ‘हॉस्पिटलचे काम चांगले झाले आहे. माढा मतदारसंघातून आपला एकही मंत्री नाही. माझं सोडं, मी पहिल्यांदाच आमदार झालो आहे. पण शिवसेनेतल्या कुणालाही घेतलं नाही. बबनदादा शिंदे सारखे 30-30 वर्ष निवडून आले त्यांनाही संधी नाही. त्यामुळे आम्हाला कुणी काय विचारेल माहिती नाही. घर की कोंबडी दाल बरा बर होऊन बसलंय, आमचा कुणी विचार करायला तयार नाही, गप्प बसा जा गावाकडे, असं म्हणत पाटील यांनी आपली मनातली खदखद बोलून दाखवली. ‘मी पहिल्यांदाच शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो. त्यामुळे मला पहिल्यांदाच लांब राह्याला सांगितलं होतं. त्यामुळे मला वाटत नाही या सरकामध्ये आमचं कोणी एकेल. आमचा कोण विचार करेल असंही आता वाटत नाही. असं म्हणत, पाटील यांनी आपल्या सरकारला घरचा अहेर दिला आहे. यापूर्वीही आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आमदार पाटील यांचे भाजप नेत्यांशी इतर नेत्यापेक्षा चांगले सख्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.