नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेना कुणाची? तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला आता निवडणूक आयोगापुढे होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे झालेल्या सुनावणीमध्ये हा निर्णय देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतचा निकाल येत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या कारवाईवर स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून न्यायालयात करण्यात आली, पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. शिवसेना कुणाची हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर ठाकरे गट पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे. एकनाथ शिंदे गटाची कागदपत्र तपासा, अशी मागणी ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे करणार आहे. याबाबतचं लेखी पत्र ठाकरे गट निवडणूक आयोगाला देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्याकडे असलेले लोकप्रतिनिधी आणि शिवसेना पदाधिकारी यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहेत. तसंच येत्या काळात आणखी काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी शिंदेंकडे आले तर त्यांचीही प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे देण्यात येतील. याप्रमाणे उद्धव ठाकरे गटही त्यांच्याकडच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगापुढे सादर करतील. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल, तसंच सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक आयोग साक्षीसाठी बोलावण्याची शक्यताही आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू असतानाच राज्यात महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे जर शिवसेना कुणाची हा निकाल लागू शकला नाही, तर निवडणूक आयोग शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकतं. या परिस्थितीमध्ये ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना वेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.