मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड, 21 फेब्रुवारी : एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे आता राजकीय परिणाम उमटत आहेत. नांदेडमध्ये वारीस पठाण यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला. मात्र, यावेळी एक शिवसैनिक थोडक्यात बचावला.
नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर आज सायंकाळी शिवसेनेने वारीस पठाण याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुतळ्याचे दहन करताना उत्साही शिवसैनिक भान हरवून बसले आणि त्याच पुतळ्याचा भडका उडाला. या आगीने तिथे उपस्थित शिवसैनिक राजू मोरे यांच्या अंगावरील कपड्याने अचानक पेट घेतला. परंतु, वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. सुरुवातीला शिवसैनिक एकत्र आले अणि त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
नांदेड : वारीस पठाण यांचा पुतळा जाळताना शिवसैनिक पेटला pic.twitter.com/uoAzfflx5F
— News18Lokmat (@News18lokmat) February 21, 2020
वारिस पठाण यांच्यावर ओवेसींची कारवाई
दरम्यान, 15 कोटी 135 कोटींना भारी पडतील असं वक्तव्य करून वाद निर्माण करणारी वारिस पठाण यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांची खप्पामर्जी ओढवलीय. पठाण हे AMIMचे महाराष्ट्रातले नेते आणि माजी आमदार आहेच. पठाण यांच्या वक्तव्यामुळे ओवेसे हे अत्यंत नाराज आहेत. पुढील आदेशापर्यंत त्यांना माध्यमांना बोलण्यास बंदी घातली आहे. पठाण वारंवार अशी वक्तव्य करतात त्यामुळे वाद निर्माण होतो. त्याचबरोबर समाजात चुकीचा संदेश पसरतो अशी पक्षाची भावना आहे. त्यामुळे त्यांना बोलण्यास बंदी घालण्यात आलीय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पठाण हे विजयी झाले होते. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
काय बोलले वारिस पठाण?
"15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!" असं म्हणत मुस्लीम समुदायापुढे चिथावणीखोर भाषण करणाऱ्या माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर टीका होत आहे. कर्नाटकात गुलबर्गा इथल्या पठाण यांच्या भाषणाचा VIDEO माध्यमांमधून फिरत आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याची शक्यता असणारी वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी या भाषणात केली.
"इट का जवाब पत्थर से' हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या', अशी चिथावणीखोर भाषा वापरत MIM चे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं. All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)चे नेते वारिस पठाण माजी आमदार आहेत. मुंबईतल्या भायखळा मतदारसंघातून ते गेल्या विधानसभेत निवडून आले होते.
CAA च्या विरोधातल्या मोर्चांचा संदर्भ देत ते या भाषणात म्हणाले, "ते म्हणतात आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल!", अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.