अमरावती, 22 एप्रिल : अमरावती जिल्ह्यासह राज्यात हनुमान चालिसा **(Hanuman Chalisa)**वरून राजकीय वातावरण चागलेचं तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) या निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा हट्ट धरला आहे. राणा दाम्पत्य आज सायंकाळी 7 वाजता बडनेरा रेल्वे स्टेशनवरून आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत निघणार आहेत तर दुसरीकडे याला उत्तर देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील (Amravati district) शिवसैनिक देखील सज्ज झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत राणा दाम्पत्याला अमरावतीवरूनच निघू देणार नाही यासाठी शिवसैनिकांनी तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करून आज सायंकाळी बडनेरा रेल्वे स्थानकावर उपस्थित राहा असं आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर राणा समर्थक शिवसैनिक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. ‘चांगलाच पाहुणचार घेऊ’, शिवसेना आमदाराचा रवी राणांना थेट इशारा अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीस म्हणण्याचा चंग बांधला आहे. पण, रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी तिथे जाऊनच दाखवावे, त्यांचा चांगलाच पाहूणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी थेट आमदार रवी राणा यांना उघडपणे धमकीच दिली आहे. ‘अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कुटुंब हे नौटंकी करत असून प्रसिद्धीसाठी नाटक करीत आहेत. राणा कुटुंब निवडून आले राष्ट्रवादीच्या भरवश्यावर आता चमचेगिरी करत आहे भाजपची. असे भारतीय जनता पार्टीने या राज्यात असे बरेच भूकणारे कुत्रे सोडलेले आहेत, जसे राज ठाकरे, नारायण राणे, किरीट सॊमय्या व आता हे राणा कुटुंब हे सर्व ते आहेत, अशी विखारी टीका संजय गायकवाड यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.