सोलापूर, 28 मार्च : महाविकास आघाडी सरकार **(Mahavikas Aghadi)**मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Shiv Sena MLA Tanaji Sawant) यांनी जाहीर कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस **(Congress)**वर निशाणा साधला आहे. निधी वाटपावरुनही तानाजी सावंत यांनी शिवसेनेला दुय्यम वागणूक दिल्याचं म्हटलं आहे. सोलापूर येथील एका कार्यक्रमात तानाजी सावंत म्हणाले, जवळपास अडीच वर्षे होत आले. अचानक सत्तांतर झालं आणि बाशिंग बांधलेले बसले. 2019 पासून आजपर्यंत या तानाजी सावंत ने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा एक वाक्य केलेलं असेल तर दाखवावे मी आत्ताच आमदारीचा राजीनामा द्यायला तयार आहे. यालाच कांड पिंकवणं असं म्हणतो, मग या पक्षाचा स्त्रोत कुठेय? यांचा चाललेला घोडा कसा आवरायचा? पक्षाला खाली कसं आणायचं? विविध पक्षांच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरुन दोन वर्षे कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी या कार्यक्रमात बोलत आहे. यापूर्वीही बोललो होतो.
त्यांनी पुढे म्हटलं, शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे. त्याच्या मनगटातील रग ही वेगळीच आहे. ती कुठल्याही पक्षाने आजमावयचा प्रयत्न करु नये, भविष्यात पण करु नये. नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. शिवसेनेला कुठंतरी दुय्यम वागणूक मिळत आहे आणि हे अर्थसंकल्पातून देखील समोर आलं आहे. आज 57 ते 60 टक्के बजेट राष्ट्रवादीला दिलं जातं. जवळपास 30 ते 35 टक्के बजेट काँग्रेसला दिलं जातं आणि शिवसेनेला केवळ 16 टक्के बजेट दिलं जातं. वाचा : पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य नाना पटोलेंना भोवणार? भाजपच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य या 16 टक्क्यांमधील उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री आमचे असल्याने पगारावरच सहा टक्के खर्च होतो. मग विकासासाठी काय? तर विकासासाटी केवळ 10 टक्के निधी आहे. खेदाने मी आज व्यक्त करतो की, माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा सोलापूर, यवतमाळच्या जिल्हा प्रमुख, संपर्कप्रमुखांचे फोन येतात की, त्या ठिकाणचा राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीचा सदस्य देखील हसन मुश्रीफांकडे जाऊन एक-दीड कोटींची कामे घेऊन येतो असंही त्यांनी म्हटलं. तानाजी सावंत यांनी पुढे म्हटलं, जे आमदाराला मिळत नाही आणि मग शिवसेनेला काय? नुसतंच गोडगोड. आमच्यामुळे हे सत्तेत आले आणि आमच्या मांडीला मांडी लावून बसले, आमची घडी विस्कटवायचा तुम्ही प्रयत्न करत आहात. हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या शरीरात आहे तोपर्यंत आम्ही वाट पाहू, आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत.