जालना, 5 जून : एकीकडे मृग नक्षत्रापूर्वीच राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने वातावरण थंड होत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha Election 2022) राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. भाजपविरोधात (BJP) सर्व राजकीय पक्षाचे आमदार एकत्र येणे, आमदार फुटू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवणे, त्यांना अज्ञातस्थळी नेने यासह अनेक क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपचा घोडेबाजार रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात असल्याचा दावा केला आहे. सुभाष देसाई आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. “आम्ही आमदार फक्त अधिवेशनाला जमतो. आता या निमित्ताने एकत्र भेटतोय. आम्ही एकत्र जमलो देखील पाहिजे. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे डावपेच चाललेले आहेत. त्यांनी राजकारण केलेलं आहे. आता घोडेबाजार करु नये, त्यासाठी त्यांना संधी मिळू नये, असं शिवसेनेने ठरवंल आहे”, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली. ( गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली, शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका ) सुभाष देसाई यांना यावेळी आमदारांसाठी कुठलं हॉटेल बुक केलंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये थांबायची गरज नाही. पण एका ठिकाणी कॅम्प केला जाईल तिथे सगळे आमदार जमतील, असं उत्तर दिलं. यावेळी सुभाष देसाई यांनी राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर महाविकास आघाडीचाच उमेदावर जिंकणार असं वक्तव्य केलं. भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. नाहीतर तसं नसतं तर त्यांनी बैठका कशाला सुरु केल्या? भाजपच्या पोकळ बाता आहेत. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार दणदणीत मतांनी विजयी होणार, असा दावा सुभाष देसाई यांनी केला. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात अटीतटीची लढत राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election 2022) प्रत्यक्षात मात्र शिवसेनेसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे (Maha Vikas Aghadi) अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची (Maharashtra Government) धाकधूक वाढली आहे. पहिल्या दोन उमेदवारांना विजयी होण्याइतकी मते देवून भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडे तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देवूनही 38 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. म्हणजे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 4 मतांची गरज आहे. पण सहाव्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या 42 मतांचा कोटा पूर्ण न केल्यास मग मात्र दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत. ही मते मोजताना अगोदरच्या पाच उमेदवारांपैकी सर्वाधिक जास्त मते ज्या विजयी उमेदवाराने मिळवली आहेत. त्याची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातात. म्हणजे भाजपच्या एखाद्या विजयी उमेदवाराची मते समजा 46 आहेत आणि इतर उमेदवारांची मते त्यापेक्षा कमी आहेत. तर भाजपच्या त्या विजयी उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते पहिली मोजली जातील. एकीकडे 42 मतांचा कोटाही गाठायचाय आणि दुसरीकडं दुसऱ्या पसंतीची मते आपल्याच उमेदवाराची मोजली जावीत, याकरता अगोदरच्या उमेदवारांना 42 पेक्षा जास्त मतेही द्यायची आहेत. म्हणून भाजप आणि महाविकास आघाडीला अशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, सध्या तरी भाजप आणि शिवसेनेची सारी मदार ही तटस्थ असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.