रत्नागिरी, 26 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज नाही. गेल्या दोन महिन्यांमधील घडामोडी हे त्याचं ताजं उदाहरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे असणारे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे गेले. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून आमदार भास्कर जाधव हे आक्रमकपणे उद्धव ठाकरेंची बाजू मांडत आहेत. भास्कर जाधव यांचा हा आक्रमकपणा विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पाहायला मिळाला. त्यामुळे भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खमकेपणाने उभे आहेत, असं सध्याचं चित्र आहे. पण या सगळ्या घडामोडींदरम्यान आज एक वेगळी घटना समोर आली. शिवसेनेचे खमके शिलेदार भास्कर जाधव यांनी आज भाजपचे बडे नेते आणि राज्याचे सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या गाडीतून प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. कोकणात आज भास्कर जाधव आणि रविंद्र चव्हाण यांची भेट झाली. त्यामागील कारण थोडसं वेगळं देखील आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या स्वागताकरता भास्कर जाधव परशुराम घाटात हजर होते. चव्हाण यांच्या स्वागतानंतर भास्कर जाधव हे परशूराम बस स्टॉप ते गेस्ट हाऊस एकाच गाडीने प्रवास करत गेले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ( लग्नाचे अमिष दाखवून बलात्काराचा आरोप, भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांना सर्वात मोठा दिलासा ) या भेटीनंतर भास्कर जाधव यांनी आपली भूमिका मांडली. कोकणाला मोठ्या काळानंतर सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे. त्यामुळे त्याचा फायदा कोकणाला निश्चितच होईल. आमच्या मागण्या विरोधकांच्या मागण्यांच्या म्हणून न घेता विकासाला प्राधान्य आमचे मित्र देतील, अशी आशा आहे. सरकार सकारात्मक पद्धतीने विचार करणार असेल तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.