गुहागर, 8 नोव्हेंबर: भाजपच्या (BJP)जीवावर महाराष्ट्रात शिवसेना (Maharashtra Shiv Sena) निवडून आली, असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Shiv Sena MLA Bhaskar Jadhav) यांनी रविवारी चांगलाच समाचार घेतला. प्रदीर्घ काळानंतर भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणातून भाजपवर सडकून टीका केली. 2018 ची बंद झालेली फाईल उघडली तर भाजपचं पितळ उघडं पडेल. या भीती पोटीच महाराष्ट्रात भाजपची पळापळ सुरू आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
मात्र, पक्षानं मला किमान प्रवक्ता केलं असतं तर भाजपला तोंड वर काढू दिलं नसतं, अशी मनातील खदखदही भास्कर जाधव यांनी यावेळी बोलून दाखवली.
हेही वाचा...गौरी गडाख यांच्या मृत्यूबाबत झाला मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर
भास्कर जाधव म्हणाले, ज्यांच्याशी मैत्री करायची त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भाजपची जून परंपरा आहे. ही परंपरा भाजप नेहमीच पाळत आली आहे. विधानसभा निवडणुकीत युती असूनही भाजपने आपल्याला कसा दगा दिला, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहेय
महाराष्ट्रात आज भाजप केवळ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनामुळेच आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. ते म्हणाले की तिकडे बिहारमध्ये जाऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही फक्त नरेंद्र मोदी यांना मानतो. दुसरं कोणाला मानत नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी राजकारणात पुढे आलेत, हे विसरून चालणार नाही. हे सांगताना भास्कर जाधव यांनी गुजरात दंगलीचाही दाखला दिला.
आज अयोध्येत राम मंदिराची वीट उभारली जाणार असेल तर ती पहिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने लावली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले. ज्यावेळी बाबरीचा मुद्दा समोर आला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच नाव सर्वात पुढे होतं हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घायला हवं, असं ते म्हणाले.
भाजपला मराठी माणसाचा द्वेष आहे. केंद्रातल्या नेत्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपची मंडळी अर्णब गोस्वामी यांना पाठिंबा देत आहे. कोण अर्णब गोस्वामी, कोण तो सुशांत सिंग राजपूत ? यांचं महाराष्ट्रात योगदान काय? असे म्हणत त्यांनी अर्णब गोस्वामीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपला भास्कर जाधव यांनी धारेवर धरलं.
ज्या माणसाने एका मराठी माणसाचे कष्टाचे पैसे थकवत त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्याच्या तसा लेखी पुरावा आहे. असं असतानाही भाजपची मंडळी दिल्लीतल्या नेत्यांना खुश करायला अर्णबसाठी रस्त्यावर उरलेत हा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी लोकांचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका केली.
व्यक्त केली मनातील खदखद..
शिवसेनेने मला साधा प्रवक्ता केला असता तर भाजपच्या लोकांना मान वर काढू दिली नसती, अशी खदखद भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा...शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
राम कदम पोरी पळवण्यात मदत करतात...
भाजप नेते राम कदम यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. राम कदम हे कंगना रणौतच्या सुरक्षेविषयी बोलत होते, ती सुरक्षा कंगना रणौत ही राम कादमांच्या भीतीमुळेच मागत होती, अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी केली. कारण राम कदम पोरी पळवण्यात मदत करतात, हे सर्वांना माहीत आहे. याच भीतीपोटी कंगना सुरक्षा मागत असावी, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे. सत्ता स्थापनेच्या जवळपास वर्षभरानंतर भास्कर जाधव यांनी पहिल्यांदाच भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Udhav thackarey