जालना, 9 जून- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव असल्याचे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जालन्यात केलं आहे. खैरे तुम्ही काळजी करू नका, पुढचा विजय आपला आहे, असा विश्वास देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी खैरेंना दिला. औरंगाबाद उघड्यावर सोडणार नाही. पुन्हा औरंगाबादवर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार देखील उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवला आहे. दरम्यान, मागील 20 वर्षांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करणाऱ्या शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. या मतदारसंघातून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे रविवारी जालना येथे दुष्काळी दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावातील चारा छावण्यात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं वाटप करण्यात आले. उद्धव यावेळी म्हणाले, तुम्ही मला मतं दिली.पण मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. म्हणून लोकसभा निकालानंतरही मी तुमच्यासमोर आलो आहे. शेतकऱ्यांना मदत केली नाही तर मी पक्ष प्रमुख म्हणून नालायक आहे. मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडणार ही योजना खूप चांगली. जनतेच्या आशीर्वादाशी कधी गद्दारी करणार नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं रविवारी सकाळी हेलिकॉप्टरने जालन्यात आगमन झाले. कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मराठवाडा दौऱ्यात अर्जुन खोतकर यांच्या घरी चहापान केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पाण्याच्या टँकरचे उद्घाटन आणि रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले. जिल्ह्यातील साळेगाव येथे चारा छावणीला भेट दिली. अंबाबाई लवकर दुष्काळ संपू दे.. उद्धव ठाकरे म्हणाले की, अंबाबाईला प्रार्थना केली लवकरात लवकर दुष्काळ संपू दे. माझं ज्याच्यावरती घर चालतंय तो शेतकरी संकटात आहे. पाऊस पडला तर लगेच चारा उपलब्ध होणार नाही म्हणून ही मदत आहे. मराठवाड्यातीस दुष्काळ संपेपर्यंत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असेच उभे राहू असं वचन त्यांनी यावेळी दिले. पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आलं नाही?- चंद्रकांत खैरे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभव पचवणं अवघड जातंय. पराभवाच्या धक्क्यातून ते अजुनही सावरू शकले नाहीत. मी कायम शिवसेनेसाठी आणि लोकांसाठी काम केलं. ही माझी शेवटची निवडणूक होती. हा पराभव बघावा लागणं हे क्लेशकारक आहे. हा पराभव पाहाण्याआधी मला मरण का आलं नाही असे भावनिक उद्गगार त्यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना काढले. खैरे म्हणाले, मी ही शेवटची निवडणूक लढवणार होतो आणि नंतर देशभर शिवसेनेचा प्रचारक म्हणून फिरणार होतो. हे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही सांगितलं होतं. मी कायम लोकांसाठी राबलो. बंगला, घर, फॉर्म हाऊस अशी संपत्ती गोळा केली नाही. फक्त शिवसेना आणि हिंदू बांधवांसाठी आणि जे सोबत आले अशा सगळ्यांसाठी काम केलं असं असतानाही पराभव पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग माझ्यावर आला असं भावनिक होत त्यांनी शिवसैनिकांसमोर आपलं दु:ख व्यक्त केलं. VIDEO: इंद्रायणी नदीकाठावर मृत माशांचा खच
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.