यवतमाळ, 28 मार्च : राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन (food in lower coast) उपलब्ध करुन देण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray Government) 'शिवभोजन' योजना (Shiv Bhojan Scheme) सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत संपूर्ण राज्यभरात गरीब जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली जात आहे. मात्र, याच शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी करणारं भयाण वास्तव समोर आलं आहे.
गरीब नागरिक उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवथाळी भोजन सुरू केले. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यावर नंतर चक्क शौचालयातील पाण्याने धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
हा आहे व्हायरल VIDEO
हा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे आणि शिवभोजन केंद्रातील अन्न आणि तेथील स्वच्छतेचा प्रश्न समोर आला आहे. विशेष म्हणजे हे शिवथाळी, शिवभोजन केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचे असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सरकारच्या हेतूला हरताळ फसल्या जात आहे.
वाचा : आघाडीत बिघाडीचे संकेत; शिवसेना आमदाराचे जाहीर कार्यक्रमात काँग्रेस - राष्ट्रवादीवर टीकेचे बाण, पाहा VIDEO
अशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडू धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडविल्या जात आहे. आता या शिवथळी केंद्र चालकांवर काय कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हा एक व्हायरल व्हिडीओ आहे. याची सत्यता आम्ही पडताळलेली नाहीये)
शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
शिवभोजन केंद्रांबाबत तक्रारी लक्षात घेता यापूर्वीच शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दिले होते. इतकेच नाही तर नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते.
तसेच शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी अधिकाऱ्यांची पथके तयार करा. शिवभोजनच्या गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचंही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.